स्त्रिया आणि आरोग्य

लोकसंख्या प्रश्न: गरिबीचं कारण की गरिबीचा परिणाम?

काय आहे ही पुस्तिका?

ही पुस्तिका म्हणजे भारताच्या लोकसंख्या धोरणाबाबतची एक अभ्यासपूर्ण मांडणी आहे. लोकसंख्या नियंत्रण सक्ती विरोधी अभियान, महाराष्ट्र यांच्या वतीने २००५ मध्ये ही तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेत महाराष्ट्राच्या स्थितीचा संदर्भ घेत लोकसंख्या धोरण आणि दोन अपत्यांचा निकष याविषयी प्रश्न निर्माण केले आहेत. बहुतेकांना असे वाटते, की लोकसंख्या ही च भारताची खरी समस्या आहे, विकासाचा संबंध लोकसंख्या कमी असण्याशी आहे, परंतु या चुकीच्या धारणा निर्माण केल्या गेल्या आहेत. नसबंदी किंवा सक्तीचा दोन अपत्यांचा नियम गरिबी किंवा जननदर कमी करु शकत नाही, याबाबत अभ्यासपूर्ण आकडेवारीसह लोकसंख्या धोरणाची संकल्पना आणि वास्तव स्थिती पुस्तिकेतून स्पष्टपणे मांडली आहे. याबरोबरच जगण्यातील मुलभूत प्रश्न ;ांना फाटा देत हे धोरण सामान्य जनतेसाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी कसे अन्यायकारक ठरले आहे, यावर भाष्य करण्यात आले आहे. स्त्रियांच्या सामाजिक दर्जातील सुधारणा, पालकांचे शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्यास जननदर कमी होऊ शकतो, या मुद्द्यावर पुस्तिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे.

कुणासाठी उपयुक्त आहे ही पुस्तिका आणि कशी?

शिक्षण, आरोग्य, शेती, रेशन, पाणी आणि रोजगार अशा मुलभूत हक्कांवर आधारित क्षेत्रांमध्येही लोकसंख्या धोरणाच्या अटी लागू करण्याचे प्रथमच जाहीर करण्यात आले. यामागील राजकारण समजून घेण्यासाठी ही पुस्तिका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांना उपयोगी ठरली आहे. तसेच स्त्रियांचे आरोग्य, हक्क आणि शासनाचा उथळ दृष्टीकोन सम जून घेण्यासाठीही ही पुस्तिका उपयोगी आहे.

 

स्त्रियांमधील रक्तपांढरी

काय आहे या पुस्तिकेत? आणि कशासाठी?

ॲनिमिया/रक्तपांढरी म्हणजे काय? रक्तपांढरीचे प्रकार कोणते, लक्षणे कोणती, कारणे काय असतात, स्त्रियांमध्ये रक्तपांढरी अधिक प्रमाणात का आढळते, बरे होण्यासाठीचे उपचार कोणते आहेत, प्रतिबंधक उपचार कोणते आहेत, रक्तपांढरीची तपासणी कशी करतात आणि रक्तपांढरीबाबतचे धोरणात्मक उपाय याबाबतची सविस्तर माहिती आणि दृष्टीकोन या पुस्तिकेतून मांडले आहेत. पुस्तिकेची सुरुवात आणि शेवट सुमन नावाच्या स्त्रीच्या गोष्टीने केला आहे. या गोष्टीच्या संदर्भाने आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या आरोग्यविषयक परिस्थितीची जाण आणि भान जागवण्यात मदत होऊ शकेल.

ही पुस्तिका कुणासाठी उपयोगी आहे?

सार्वजनिक आरोग्य, मुली आणि स्त्रियांचे आरोग्य या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, आरोग्य सेविका/सेवकांना या पुस्तिकेचा माहितीसाठी, जाणीव जागृतीसाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल. पोषक आहार आणि रक्तपांढरीविषयीच्या आणखी काही उपयुक्त साहित्याचा आणि तथापि ट्रस्टच्या प्रकाशनांचा अंतर्भाव देखील पुस्तिकेच्या मागील पानांवर केला आहे. तथापि ट्रस्टने ही पुस्तिका २००८ साली प्रकाशित केली आहे.

 

मैत्री आरोग्याशी: स्त्रिया आणि आरोग्य संवाद पुस्तक

Maitri-Arogyashi

संपूर्ण प्रशिक्षण संचाची पीडीएफ प्रत हवी असल्यास tathapi@gmail.com वर मेलद्वारे मागणी नोंदवावी.

हे पुस्तक कशासाठी?

‘आपल्या शरीराशी आपली दोस्ती’ हा मानवी आरोग्याचा पाया आहे. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रियांशी ओळख होणं ही शरीराशी मैत्री होण्यातील पहिली पायरी असते. ही मैत्री अधिकाधिक वृद्धींगत व्हावी, स्त्री आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा या उद्देशांनी ‘मैत्री आरोग्याशी’ हे ‘स्त्रिया आणि आरोग्य’ विषयक कौशल्यपूर्ण संवाद साधणारे पुस्तक निर्माण करण्यात आले. विशेषतः स्त्री आरोग्याचा विचार करताना, आरोग्य शिक्षण हे वैद्यकीय माहितीपर्यंत थांबत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींचा विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. आपल्या स्त्रियांचं समाजातील, कुटुंबातील दुय्यम स्थान, परिणामी स्त्रियांच्या आरोग्याची अवहेलना, दुर्लक्ष हे वास्तव चित्रण पाहता स्त्रियांना आपल्या आरोग्याशी मैत्री करायला शिकणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी स्त्रियांसोबत त्यांच्या परिस्थितीविषयी, त्यांच्या आजारपणांविषयी, एकूणच त्यांच्या जगण्याविषयी संवाद करायला शिकवणारं हे एक पुस्तक आहे. या संवादातून उपाय शोधण्यावर भर देण्यात आला आहे.

काय काय आहे या पुस्तकात?

पुस्तकाला इतर संवाद साहित्याची जोड देखील आहे. त्यामुळे ‘मैत्री आरोग्याशी: स्त्रिया आणि आरोग्य संवाद पुस्तक’ हा एक संसाधन संच आहे. स्त्रियांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, सामाजिक, मानसिक आरोग्य ते स्त्रीविषयक कायदे, लहान मुलांचे आजार ते लसीकरण इथंपर्यंतच्या अनेक मुलभूत विषयांचा समावेश पुस्तकात आहे. अशास्त्रीय उपचारांना, अनिष्ट रुढी/विचारांवर बेतलेल्या धारणांना विरोध करता यावा, म्हणून आवश्यक तिथे ‘समज/गैरसमज आणि तथ्य’ सांगणारे रकाने दिले आहेत. प्रत्येक सत्राच्या शेवटी ‘शोधून पाहू’ या भागात संबंधित विषयाबाबत त्या स्थानिक भागातून काय काय माहिती घेता येईल, याबद्दलचे प्रश्न दिले आहेत.

हे पुस्तक कुणासाठी उपयोगी आहे? कसे वापरायचे?

‘स्त्रिया आणि आरोग्य’ विषयक संवाद साधणाऱ्या संवादकांसाठी ‘मैत्री आरोग्याशी’ हे संवाद पुस्तक अतिशय उपयोगी आहे. संबंधित विषयांशी निगडित केस स्टडीज, वेगवेगळे खेळ आणि उपक्रमांचा समावेश आणि सहभागींसोबत ते कशा पद्धतीने घ्यायचे याबाबतही स्पष्ट विवरण पुस्तकात आहे. संवादकांना सहजतेने संवाद साधता यावा आणि सहभागींना समजण्यास सहाय्य व्हावे या दृष्टीने हे महत्वाचे आहे. पुस्तकाचा योग्य प्रकारे वापर व्हावा, यासाठी सत्र घेण्याच्या सूचना, पद्धती, सत्राचे उद्देश, आवश्यक साहित्य, ‘संवादकांसाठी महत्वाचे’ आणि सत्राच्या शेवटी ‘आपण काय शिकलो?’ च्या चौकटी, संदर्भ साहित्य यांचा नेमका अंतर्भाव केला आहे. एकूणच, पुस्तक प्रत्यक्ष उपयोगात येईल याची व्यवस्थित दखल घेतली गेली आहे. सन २००९ साली तथापिने हे संसाधन प्रकाशित केले आहे.

 

स्त्रिया आणि आरोग्य: काही उपयुक्त संसाधने (संसाधनांची सूची/रिसोर्स डायरी)

women-and-health-resource-diary

हे संसाधन कशासाठी?

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी, आरोग्य विषयातील प्रशिक्षणांसाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांची गरज लक्षात घेऊन ही काही उपयुक्त संसाधनांची सूची (रिसोर्स डायरी) असणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महाराष्टात बऱ्याच व्यक्ती आणि संस्था साधनं विकसित करत असतात, पण ही माहिती इतरांपर्यंत पोहचतेच असं नाही. या विचारातूनच महिला आणि आरोग्य विषयाशी संबंधित संसाधने एकत्रित करण्याचे तथापि ट्रस्टने ठरवले. उपलब्ध साधन/साहित्याची थोडक्यात माहिती सर्वांपर्यंत पोहचवणे आणि अशी संसाधने एका ठिकाणी उपलब्ध करुन देणे असे या पुस्तिकेच्या निमिर्तीमागील उद्देश आहेत.

या पुस्तिकेत नेमकं काय काय आहे?

वेगवेगळ्या संस्था-संघटनांना भेटी देऊन संसाधनांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया दोन वर्षे चालू होती. यामध्ये पोस्टर्स, प्रशिक्षण साहित्य, गाणी, खेळांचे संच, नाट्यसंहिता, पपेट शो अशा विविध साहित्याचा समावेश होता. यांचे मूल्यमापन करुन त्यातून वापरास सहज, सोपी असणारी, लिंगभाव संवेदनशील असणारी संसाधने या पुस्तिकेत आहेत. तसंच काही व्यावसायिक प्रकाशन संस्थांची पुस्तकेही यात समाविष्ट केली आहेत. बहुतेक संसाधने ही मुली आणि महिलांचे आरोग्य, बालसंगोपन, बालसंगोपन आणि आजार प्रतिबंध याविषयी आहेत. पाच प्रकरणांमध्ये त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

पुस्तिकेचा वापर कसा करता येईल?

अनुक्रमणिकेचा संदर्भ घेऊन विशिष्ट विषयाशी संबंधित संसाधन मिळू शकते. संबंधित संस्था-संघटनांच्या पत्त्यांचा समावेश पत्यांच्या यादीत केला आहे. संसाधनाची भाषा, उपलब्धतेसाठी स्त्रोत नमूद केलेले आहेत. या पुस्तिकेत सातत्याने भर घातली जाईल, असा उल्लेख पुस्तिकेत आढळेल, परंतु आता इथून पुढे तथापि ट्रस्टने कामकाजात काही बदल केल्याने कोणतीही भर पुस्तिकेत घातली जाणार नाही याची नोंद घेतली जावी. सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगात संसाधनांची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकते. तरीही या पुस्तिकेचा आजही चांगला उपयोग होऊ शकतो, असा विश्वास आहे. संबंधित विषयांतील प्रशिक्षणांसाठी, जनजागृतीसाठी यातील संसाधनांचा निश्चितच उपयोग करता येईल. सन २००६ मध्ये ही पुस्तिका (रिसोर्स डायरी) तथापिने प्रकाशित केली असून इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.

 

संजीवनी - महिला आणि आरोग्य प्रशिक्षण पुस्तक

Sanjeevani

संपूर्ण प्रशिक्षण संचाची पीडीएफ प्रत हवी असल्यास tathapi@gmail.com वर मेलद्वारे मागणी नोंदवावी.

संसाधनाचा उद्देश जाणून घेऊया?

आपल्या समाजात घराबाहेर आणि घरातही स्त्रियांना दिलं जाणारं दुय्यम स्थान, त्यांच्यावरील तिहेरी कामांचा बोजा, पण अपुरा आणि निरकस आहार, आरोग्यसेवांची अनुपलब्धी शिवाय तिथपर्यंतची अवघड पोहच, अडथळे, आरोग्याविषयक सुसंवाद साधण्यासाठीच्या जागांची, माणसांची कमतरता, संधींचा अभाव किंवा त्यावरील अवाजवी मर्यादा यामुळे अर्थातच स्त्रियांना त्यांच्या लैंगिक, प्रजननविषयक आणि मानसिक समस्यांना कष्टानं सामोरं जावं लागत असतं. परिणामी त्यांच्या आरोग्याची हेटाळणी होत असते. या निकडीच्या पार्श्वभूमीवर ‘संजीवनी: महिला आरोग्य प्रशिक्षण पुस्तक’ एका संसाधन संचाच्या रुपात साकार करण्यात आला.

स्त्रियांना आपल्या शरीराची, मनाची, आरोग्याची, आजारपणांची, शास्त्रीय उपचारांची योग्य माहिती मिळावी, स्वतःच्या आरोग्याविषयीचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित व्हावा, हाच संसाधन निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे.

काय काय आहे या संसाधन संचात?

हा एक संसाधन संच आहे, ज्यामध्ये प्रशिक्षण पुस्तक, ठळक माहितीसह चित्रं, आकृत्यांचा समावेश असलेला फ्लॅश कार्ड संच, माहितीची सत्रं घेताना आवश्यक असणाऱ्या संबंधित तक्त्यांचा संचही मुख्य संचात समाविष्ट आहे. विषयांशी निगडित वेगवेगळ्या केस स्टडीज, प्रात्यक्षिकं आणि उपक्रमांचा समावेश प्रशिक्षण पुस्तकात आहे. अशा प्रकारे संवादासाठीचे मुलभूत साहित्य आणि आशयातील वैविध्याने संसाधनालाही परिपूर्णता मिळाली आहे.

हे संसाधन कुणासाठी उपयुक्त आहे?

आरोग्य सेवा-सुविधांपर्यंतची स्त्रियांची पोहच सहज-सोपी नसलेल्या परिस्थितीत, गावपातळीवर, खेडोपाडी दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कार्यकर्त्यांसाठी, सर्व स्त्रियांसाठी हे प्रशिक्षण पुस्तक नक्कीच खूप उपयोगी आहे आणि याच विश्वासाच्या बळावर हे संसाधन प्रत्यक्षात आले.

तथापि ट्रस्टच्या ‘संजीवनी महिला आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमां’तर्गत या संसाधन संचाची निर्मिती सन २०१२ मध्ये करण्यात आली आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगढ या तीन राज्यांमध्ये राबवण्यात आला. सदर प्रकल्पातील ‘संजीवनी’ महिला आरोग्य कार्यकर्त्यांना या संचाचा निश्चितच खूप चांगला उपयोग झाला आहे.

‘संजीवनी: महिला आरोग्य प्रशिक्षण पुस्तक’हे संसाधन हिंदी भाषेतही प्रकाशित केले गेले आहे.

 

ॲनिमिया मिरर चार्ट अर्थात ‘आपल्या रक्ताची लाली आपण स्वतःच तपासा’

भारतात ॲनिमियाचे प्रमाण अधिककरुन स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये आणि काही प्रमाणात पुरुषांमध्येही आढळते. साधारणपणे, शरीरातील रक्त कमी झालं आहे असं म्हटलं जातं. पण वास्तविक पाहता, ही रक्ताची कमी नसून रक्ताचा लालपणा कमी झालेला असतो. आपले आरोग्य आपल्या हातात, या तत्वावर आधारित तथापिचा कार्यप्रवास आजवर होत राहिला आहे. या चार्टची निर्मिती हा सुद्धा त्यातीलच एक भाग आहे.

काय आहे बरं हा ‘ॲनिमिया मिरर चार्ट’?

खरं तर नावातच त्याची ओळख आहे! ॲनिमिया म्हणजेच रक्तपांढरी किंवा रक्तक्षय. याविषयी मुद्देसूद माहिती देणारा, विशेषकरुन त्यावरील एका छोट्याशा आरशाद्वारे आणि काही चित्रांचं निरीक्षण करुन आपण स्वतःच आपल्या रक्ताची लाली तपासू शकतो हे सोपेपणाने शिकवणारा हा ॲनिमियाविषयक मिरर चार्ट आहे.

आपल्या ओठाच्या आतील भाग, जीभ यावरुन रक्ताची लाली किती कमी झाली आहे किंवा नाही, हे समजते. ॲनिमियाची लक्षणे, कारणे समजून घेऊन रक्तपांढरी दूर करण्यासाठी साध्या-सोप्या तसेच वैद्यकीय उपायांची माहिती देणारे हे एक संसाधन आहे.

हा ॲनिमिया मिरर चार्ट कुणासाठी आणि कसा वापरायचा?

ॲनिमियाविषयी जन जागृती करण्यासाठी सरकारी आरोग्य केंद्रे, खाजगी दवाखाने, शाळा, अंगणवाडी, अशा अनेक खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी हा चार्ट लावता येऊ शकतो. आरोग्यविषयक प्रशिक्षणांमध्ये स्वयंसेवी संस्था, खाजगी व सरकारी आरोग्य यंत्रणा याचा उपयोग करत आहेत. रक्ताची लाली तपासण्यासाठी आपल्या जिभेच्या लालपणातील तसेच फिकटपणातील फरक दर्शवणारी वेगवेगळी चित्रंही दिली आहेत. जेणेकरुन प्रत्येक प्रशिक्षणार्थीला हा चार्ट हातात घेऊन आरशामध्ये स्वतःच्या रक्ताची लाली तपासून पाहण्याचे प्रात्यक्षिक करता येते.

 

साद आरोग्याची माहितीपत्रकं

काय आहेत साद आरोग्याची माहितीपत्रकं? कशासाठी?

‘साद आरोग्याची’ हे एक ‘स्त्रिया आणि आरोग्य’ विषयक माहिती देणारे माहिती पत्रक आहे. एकूण १२ माहिती पत्रकांची ही एक मालिका आहे. हृदयरोग, क्षयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे स्त्रियांवरही परिणाम होतात. स्त्रियांमधील अशा काही निवडक गंभीर आजारांचे प्रमाण, लक्षणे, उपाययोजना याबाबत स्त्रियांच्या दृष्टीकोनातून ‘साद आरोग्याची’ या माहितीपत्रकांच्या मालिकेतून मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे. तसेच आपल्या मुलभूत हक्कांसाठी लढण्याची गरजही याद्वारे अधोरेखित होते. स्त्री आरोग्य विषयक प्रश्नांच्या माहितीसाठी, स्त्री आरोग्याविषयीचा दृष्टीकोन समजून घेऊन जाणीव जागृती करण्यासाठी या माहिती पत्रकांचा योग्य उपयोग करता येईल.

 

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. १

स्त्रियांवरील हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न!

या माहितीपत्रकाचा उद्देश? 

हिंसा म्हणजे फक्त मारहाण नसून इतरही अनेक पैलू हिंसेच्या प्रश्नाशी जोडलेले असतात. हे वेगवेगळे पैलू आणि स्त्रियांवरील हिंसाचार हा एक ‘सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न’ आहे हा दृष्टीकोन आरोग्य यंत्रणेसमोर, पर्यायाने सर्वांसमोर पोहचवण्याच्या उद्देशाने हे माहितीपत्रक सन २००८ मध्ये प्रसिद्ध केले आहे.

काय आहे या माहितीपत्रकात? 

महाराष्ट्रातील स्त्रियांवरील हिंसेचं दाहक रुप समजून घेताना स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार, स्त्रियांवरील हिंसा ओळखता येणं, हिंसेला सामोरं जाणाऱ्या स्त्रियांना मदत करताना घ्यावयाची काळजी, हिंसेला आळा घालण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, हिंसेला सामोरं जाणाऱ्या स्त्रियांसाठीच्या उपाययोजना, हिंसेचे स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे परिणाम, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि स्त्री चळवळीच्या मागण्या अशा विविध आवश्यक मुद्यांवर या माहितीपत्रकातून भर देण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५ आणि गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००२ या संबंधित कायद्यांविषयीदेखील मुद्देसूद आणि सुटसुटीत पद्धतीने माहिती दिली आहे. स्त्रियांवरील हिंसेसंदर्भातील इतर काही संसाधनांची यादी देखील माहितीपत्रकात देण्यात आली आहे. 

या माहितीपत्रकाचा वापर कसा करता येईल?

स्वयंसेवी संस्था-संघटना, कार्यकर्ते, स्त्रियांवरील हिंसेच्या विरोधात काम करणाऱ्या सर्व गटांचा दृष्टीकोन विकसित करण्यासाठी ह्या माहितीपत्रकांचा निश्चितच उपयोग होईल. तसेच आपल्या हक्कविषयक मागण्यांमध्ये आरोग्याच्या मुद्याची भर घालण्यासाठीही ‘साद आरोग्याची’ ही माहितीपत्रक मालिका प्रकाशित करण्याचा एक प्रयत्न आहे.

 

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. २:

स्त्रिया आणि रक्तपांढरी

या माहितीपत्रकाचा उद्देश? 

पुरुषप्रधान समाजव्यवस्था, स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम दर्जा, स्त्रियांवरील कामाचा बोजा आणि अपुरा, निरकस आहार, स्वस्त धान्याचा अपुरा पुरवठा, दुष्काळ, सरकारचे गरिबांसाठी बदलते आर्थिक धोरण, आरोग्ययंत्रणेतील त्रुटी या सर्व गोष्टी रक्तपांढरीला खतपाणीच घालत असतात. ही परिस्थिती आणि रक्तपांढरी या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता रक्तपांढरीविषयीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. जाणीव-जागृतीच्या उद्देशाने हे माहितीपत्रक सन २००८ मध्ये प्रसिद्ध केले आहे.

काय आहे या माहितीपत्रकात? 

ॲनिमिया/रक्तपांढरी म्हणजे काय? रक्तपांढरीचे प्रकार कोणते आहेत, या आजाराची आकडेवारी, लक्षणे, कारणे, परिणाम कोणते आहेत, स्त्रियांमध्ये रक्तपांढरी अधिक प्रमाणात का आढळते, रक्तपांढरीवरील उपाययोजना (औषधोपचार, प्रतिबंधक उपचार), याबाबतचे शासन निर्णय, धोरणात्मक उपाय; या सर्व मुद्यांबाबत सविस्तर माहिती आणि दृष्टीकोन या माहितीपत्रकातून मांडले आहेत. पोषक आहार व रक्तपांढरीविषयीच्या काही संसाधन साहित्याची यादी देखील या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. 

या माहितीपत्रकाचा वापर कसा करता येईल?

माहिती आणि दृष्टीकोनाच्या आधारेच कोणताही बदल घडवण्यासाठी आपण स्वतःला आणि समाजाला सज्ज करु शकतो. वैयक्तिक पातळीवर बदल करण्यासाठी, तसेच आपल्या गावात/वस्तीत रक्तपांढरीसंबंधित अभियानं राबवण्यासाठी हे माहितीपत्रक निश्चितच उपयोगात येईल. 

 

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. ३:

‘गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया’

या माहितीपत्रकाचा उद्देश? 

बरेचदा गरज नसतानाही गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्टरेक्टमी) केली जाते, तर दुसरीकडे गरज असूनही शस्त्रक्रिया टाळण्याची मानसिकता आढळते. अनेकदा पुरेशा सबळ कारणाशिवायही या शस्त्रक्रिया केल्या जातात. शास्त्रीय माहितीचा अभाव, अपुऱ्या सरकारी सेवा-सुविधा, खाजगी डॉक्टरांकडून होणारी आर्थिक पिळवणूक; ही परिस्थिती लक्षात घेता गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेविषयी सखोल माहिती असणं गरजेचं आहे. या उद्देशानेच याविषयीचे माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे.

काय आहे या माहितीपत्रकात? 

माहितीपत्रकात गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेविषयी माहिती असून ही माहिती उपलब्ध आकडेवारीतून दिली आहे. गर्भाशय काढावं लागण्यामागील कारणे, गर्भाशय काढण्याचे प्रकार/पद्धती, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टरांकडून घ्यावयाची माहिती, आवश्यक तपासण्या, मुळापासून गर्भाशय काढण्यातील धोके व परिणाम, गर्भाशय काढल्यानंतर जाणवणारी लक्षणे याविषयीची सविस्तर माहिती यात आहेच. याशिवाय ही शस्त्रक्रिया कुठे केली जाते, तिथे कोणत्या सोयी असायला पाहिजेत, ही माहितीही दिली आहे. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी भारतात करण्यात आलेल्या अभ्यासांतून समोर आलेले काही ठळक निष्कर्ष आणि आकडेवारीही मांडलेली आहे. अर्थातच स्त्रियांना या स्थितीला सामोरं जावं लागू नये, म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाययोजना दिल्या आहेत. तसेच या विषयासंबंधी अधिक माहिती देणाऱ्या पुस्तकांची यादीही आवर्जून दिली आहे.

या माहितीपत्रकाचा वापर कसा करता येईल?

माहिती आणि दृष्टीकोनाच्या आधारे आपण वैयक्तिक पातळीवर बदल करु शकतो. तसेच आपल्या गावात/वस्तीत गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेविषयी जाणीव-जागृती करता येईल. आरोग्य विषयक प्रशिक्षणांमधून आरोग्य कार्यकर्त्यांमध्ये आरोग्याबद्दलचा स्त्री संवेदनशील दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठीही या माहितीपत्रकाचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

 

साद आरोग्याची माहितीपत्रक क्र. ४:

‘प्रजनन मार्गाचा फिस्टुला’

या माहितीपत्रकाचा उद्देश? 

‘फिस्टुला’ म्हणजे प्रसूतीच्या सेवा वेळेत न मिळाल्याने प्रजनन मार्गात फट तयार होते आणि त्यातून लघवी आणि शौचाचे कण सतत येत राहतात. आशिया आणि आफ्रिका खंडातील गरीब स्त्रियांमध्ये आढळणारा हा एक गंभीर आजार आहे. या आजाराचं प्रमाण तुलनेने कमी झालं असलं तरी या आजाराला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्रियांना अत्यंत वेदना आणि अवहेलना सहन करावी लागते. त्यात हा आजार दुर्लक्षित असल्यानेही याबद्दलची नीट माहिती नसते. माहिती उपलब्ध असेल तर जाणीव जागृती निर्माण करता येईल आणि असा आजार असणाऱ्या स्त्रियांना आरोग्यसेवेपर्यंत पोहचवता येईल. या उद्देशांनी हे माहितीपत्रक सन २०१० मध्ये प्रसिद्ध केले आहे.

 कायआहेयामाहितीपत्रकात

फिस्टुला म्हणजे काय, फिस्टुलाहोण्याची कारणे, लक्षणे, या आजारामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, फिस्टुलावरील वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी, फिस्टुला होऊ नये म्हणून कौटुंबिक आणि धोरणात्मक पातळीवरील उपाययोजना; याविषयीची आवश्यक माहिती या माहितीपत्रकात देण्यात आली आहे.

या माहितीपत्रकाचा वापर कसा करता येईल?

माहिती आणि दृष्टीकोनाच्या आधारे माणसं वैयक्तिक पातळीवर बदल करण्याचा प्रयत्न करतील. तसेच आपल्या गावात/वस्तीत फिस्टुला या आजाराविषयी जाणीव-जागृती करता येईल. यासाठी माहितीपत्रक निश्चितच उपयोगात येईल. आरोग्य विषयक प्रशिक्षणांमधून आरोग्य कार्यकर्त्यांमध्ये आरोग्याबद्दलचा स्त्री संवेदनशील दृष्टीकोन विकसित व्हावा, यादृष्टीनेही हे माहितीपत्रक निश्चितच उपयोगी आहे. 

 

स्त्रिया आणि मानसिक आरोग्य... एक सुरुवात

काय आहे या पुस्तिकेत?

आपला समाज स्त्रियांची भावनिक घुसमट, त्यांचे क्लेश समजून घेत नाही किंवा दुर्लक्ष करत असतो. अनेक स्त्रियांच्या आयुष्याचे, अनुभवांचे प्रतिनिधित्व करत रमा नावाची स्त्री या पुस्तिकेतून तिची स्वतःची गोष्ट सांगत आहे. रमासारख्या अनेक कथा आपण समाजात पाहत असतो. भावनिक आरोग्य हे सगळ्यांसाठी आहे, माणसाच्या वैयक्तिक भावनिक अनुभवांच्या पायावरच ते उभे असते. या पुस्तिकेतून स्त्रियांच्या मानसिक आरोग्याविषयीचा सर्वांगीण दृष्टीकोन आणि कार्यपद्धती मांडण्यात आली आहे. स्व मदत आणि अशा आधार गटांचे महत्व, समता आणि न्याय इ. तत्त्वांवरचा विश्वास, पोषक परिसर, आपला दृष्टीकोन, सामाजिक पर्यावरण अशा अनेक गोष्टींचा सहसंबंध आणि महत्व मानसिक आरोग्यात महत्वपूर्ण भूमिका करत असते, हे सदर पुस्तिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

कुणासाठी उपयुक्त आहे ही पुस्तिका आणि कशी?

जागोजागी प्रश्न विचारत, वाचकाला विचार करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न ही पुस्तिका करते. रमाच्या गोष्टीच्या माध्यमातून एक प्रकारचा स्वाध्याय या पुस्तिकेतून निर्माण केला आहे. स्व अध्ययनामुळे नवीन संकल्पना, विविध मुद्द्यांवरील माहिती एकत्रित होऊ शकते. 

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्ये गुणात्मक सुधारणा व्हावी, समाजामध्येही अधिक संवेदनशील दृष्टीकोन विकसित व्हावा, या उद्देशाने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

स्त्रियांच्या गटांमध्ये, प्रशिक्षण कार्यक्रमांतून या पुस्तिकेचे वाचन आणि त्यावर चर्चा घेता येऊ शकते. मानसिक आरोग्याविषयीच्या स्थानिक पातळीवरील जाणिवा, अनुभव, ज्ञान शोधण्यासाठी, समजून घेण्यासाठी या पुस्तिकेचा उपयोग होऊ शकतो.

ही पुस्तिका तथापि ट्रस्ट आणि सीएएमएच (सेंटर फॉर अडव्होकसी इन मेंटल हेल्थ) द्वारे २००३ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. 

सदर पुस्तिका आता नव्या व अद्ययावत स्वरुपात यांच्याकडे उपलब्ध आहे.

 

विकासाच्या योजना: आपल्यासाठी

ही पुस्तिका कशासाठी? कुणासाठी? 

माणूस म्हणून जगण्याच्या हक्काबरोबरच इतरही आरोग्य सेवा-सुविधांचा मुलभूत हक्क स्त्रियांना मिळावा यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असते. यासाठी राबवल्या जाणाऱ्या काही खास योजनाही असतात, उदा. जननी सुरक्षा योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना; परंतु अनेक योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत न पोहचल्याने मुलभूत अशा सेवा सुविधांपासून स्त्रिया किंवा इतरही अनेक गरजू समाजघटक वंचित राहतात. आपल्या हक्काच्या योजनांची माहिती लोकांना मिळाली तर अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग करुन घेता येईल, या उद्देशाने ही पुस्तिका तथापि ट्रस्ट आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी सन २०१२ मध्ये प्रकाशित केली आहे.

काय आहे या पुस्तिकेत?

महिलांना आरोग्य विषयक सेवा-सुविधा पुरवणाऱ्या योजनांसह या पुस्तिकेत अन्नधान्य सुविधा पुरवणाऱ्या योजनांचाही समावेश आहे. कारण अर्थात अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. आर्थिक सहाय्य करणाऱ्या आणि रोजगाराशी संबंधित योजनांचा समावेशही आवर्जून करण्यात आला आहे. संबंधित योजनांची विभागीय पद्धतीने, थोडक्यात पण मुद्देसूदपणे आवश्यक अशी माहिती दिल्याने आणि सुटसुटीत मांडणीमुळेही योजना समजून घेणे सोपे जात आहे.

शासनाच्या वेळोवेळी बदललेल्या धोरणांनुसार योजनांमध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका, नर्स, ग्रामसेवक यांसारख्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून मिळवता येईल.