हे संसाधन म्हणजे कार्यशाळांच्या अहवालांचा संच आहे. तथापि ट्रस्टने सन २००० आणि २००१ मध्ये ‘पुरुषत्वाची संकल्पना, जडणघडण आणि पुरुषांची लैंगिकता’ याविषयी आयोजित केलेल्या आणि अभिव्यक्ती या संस्थेच्या सहकार्याने प्रत्यक्षात आलेल्या बैठकीचा आणि कार्यशाळांचा अहवाल संच आहे. या कार्यशाळा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या होत्या. हक्क, लिंगभाव, लैंगिकता, हिंसाचार, आरोग्य या विषयांवर स्त्रियांप्रमाणे पुरुषांसोबतही काम करण्याची अत्यंत गरज असणं, समानतेवर आधारित आणि सकारात्मक नातेसंबंध समाजात प्रस्थापित करणे; ह्या या कार्यशाळांच्या आयोजनातील प्रमुख प्रेरणा आहेत. २-३ दशकांपूर्वीपर्यंत ‘पुरुषांची लैंगिकता’ हा सर्वाधिक दुर्लक्षित आणि संदिग्ध विषय होता. ‘शरीर साक्षरता’ हा तथापिच्या कामाचा गाभा असल्याने तथापि ट्रस्टने मुलगे आणि पुरुषांसोबतच्या ‘पुरुषांची लैंगिकता, आरोग्य, समानता’ या कामाला महत्व दिले. या पार्श्वभूमीवर संबंधित विषयांशी निगडित कामकरणाऱ्या कार्यकर्त्यांची लैंगिकता, लिंगभाव समानता विषयातील समज व दृष्टीकोन समजून घेणे, याविषयीचे योग्य दृष्टीकोन तयार व्हावेत, समज वाढावी, अशा कार्यकर्त्यांची संख्या वाढावी आणि यातून आधारभूत संसाधनांची निर्मिती व्हावी, ह्या उद्देशांनी या बैठका, कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
युवक, पुरुष यांनी स्वतःच्या पुरुषत्वाच्या, लैंगिकतेच्या संकल्पना संवेदनशीलपणे तपासून पाहाव्यात, आपल्या अनुभवांविषयी मोकळेपणानं बोलावं, अंतर्मुख होऊन विचार करुन योग्य बदल आत्मसात करावेत, यासाठी संवेदनशीलपणे त्यांच्याशी संवाद साधणं, पोषक वातावरण निर्माण केलं जाणं गरजेचं आहे, या जाणिवा या कार्यशाळांतून प्रकर्षाने अधोरेखित होत राहिल्या. या दृष्टीने या कार्यशाळा, पर्यायाने अहवाल संच भविष्यातील कामांच्या दृष्टीने दिशादर्शक ठरले आहेत. म्हणूनच याविषयीचा अहवाल अधिकाधिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने त्यावेळी या अहवालांच्या प्रती तयार करण्यात आल्या.
काय आहे या अहवालांमध्ये? या अहवालांचा उपयोग कुणासाठी आहे?
बैठक आणि कार्यशाळांतून घेण्यात आलेले विषय, मुद्दे, उपक्रम, घडून आलेली चर्चा, कामांचे नियोजन याबद्दलची सविस्तर मांडणी अहवालांमध्ये करण्यात आली आहे. ‘पुरुषांची लैंगिकता व अस्मिता’ याबद्दलचे विविध दृष्टीकोन यात व्यक्त केलेले आहेत.
त्यावेळी तथापि ट्रस्टला शरीर साक्षरताविषयक कामांच्या गरजा समजून घेण्यासाठी, लिंगभाव समानता, लैंगिकता याविषयीच्या पुरुषांसोबतच्या भविष्यातील कामांची आखणी करण्यासाठी या अहवालांचा खूप उपयोग झाला आहे. संबंधित विषयांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लिंगभाव, समानता, लैंगिकता, शरीर साक्षरता या विषयांमधील कामांची सुरुवात, कार्यकर्त्यांचे तेव्हाचे विविध दृष्टीकोन, पुढे आलेले मुद्दे, चर्चांचा उहापोह याबाबतची माहिती घेण्यासाठी या अहवालांचा उपयोग होऊ शकतो.
हे संसाधन म्हणजे एका कार्यशाळेचा अहवाल आहे. १९९९ ते २००२ या काळात तथापि ट्रस्टने पुरुषत्वाची संकल्पना, जडणघडण आणि पुरुषांची लैंगिकता याविषयी राष्ट्रीय पातळीवर तीन कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. लिंगभेद, समान हक्क इत्यादीचा विचार करताना पुरुषांसोबत काम करण्याची गरज सातत्याने या कार्यशाळांतून जाणवत होती. तसेच प्रत्यक्ष काम करतानाही समानतेच्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या पुरुष कार्यकर्त्यांचीही अत्यंत उणीव भासत होती. या धर्तीवर २३ ते २५ जुलै २००३ या रोजी लिंगभाव समानता व अधिकार दृष्टीकोनाची समज असणाऱ्या पुरुष कार्यकर्त्यांचा गट निर्माण व्हावा, यासाठी तथापि ट्रस्टने पुरुष कार्यकर्त्यांसाठी ‘पुरुष आणि लिंगभाव’ याविषयी ही कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा प्रामुख्याने संस्था संचालक, प्रकल्प अधिकारी किंवा संस्थेत कार्यरत असणाऱ्या अनुभवी पुरुष कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेत स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या संकल्पना, त्यामागची कारणमीमांसा, लिंगभाव-लिंगभेद, सत्ता, पुरुषसत्ताक पद्धती असे विविध विषय हाताळण्यात आले. कार्यशाळेच्या अहवालात प्रत्येक दिवशी घेण्यात आलेले विषय, उपक्रम, चर्चा यांची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. पुरुषांचा पुरुषांसोबत संवाद होणे हा ऐरणीवरचा मुद्दा असल्याने, पुरुषांसोबत लिंगभाव व हिंसाचाराच्या प्रश्नावर अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या सतिश सिंग यांनी या कार्यशाळेसाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी संस्था पातळीवरील उपक्रमांसाठी काही कामांचे नियोजन केले, काही कामांत नवीन बदलांचा समावेश केला, या नियोजनाचा आराखडाही अहवालाच्या शेवटी दिलेला आहे.
लिंगभाव, समानता या विषयांमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना संस्थांना, विशेषतः पुरुष कार्यकर्त्यांना या अहवालाचा खूप उपयोग करता येईल.
‘पुरुष आणि लिंगभाव’ या कार्यशाळेच्या अहवालाच्या प्रती सप्टेंबर २००३ मध्ये तयार करण्यात आल्या आहेत.
महिलांच्या हिंसेचा, आरोग्याचा प्रश्न हाती घेऊन काम करणाऱ्या संस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या दीर्घ अनुभवातून काही मुद्दे प्रकर्षाने जाणवत राहिले. जसं की महिलांच्या आरोग्याची स्थिती ही एकमेकांशी निगडित अनेक घटकांचा परिणाम असते आणि महिलांचे त्यांच्या जवळच्या पुरुष व्यक्तींशी असणारे नातेसंबंध, हा त्यातील महत्वाचा घटक आहे. म्हणूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, हिंसा याविषयी महिलांसोबत संवाद साधण्याबरोबरच हिंसाचार करणाऱ्या पुरुषांसोबतही संवाद साधणं, ही अत्यंत प्राधान्याची गरज आहे, हे लक्षात आलं. या पार्श्वभूमीवर नागरिकत्व, हक्क, लिंगभाव, लैंगिकता, हिंसाचार, आरोग्य यासंबंधी युवक आणि पुरुषांमध्ये संवेदनशीलपणे, अंतर्मुख होऊन विचार करण्याची प्रक्रिया घडवून आणण्याच्या उद्देशाने संबंधित प्रश्नांवर संवाद करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, गटांसाठी एक उपयुक्त संसाधन साहित्य म्हणून या प्रशिक्षण मार्गदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय हे या प्रशिक्षण मार्गदर्शिकेतील आशयाचे मुख्य सूत्र आहेच, तरीही पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करण्याचा प्रयत्न आवर्जून केला आहे.
न्याय आणि समता, लिंगभाव, लैंगिकता, हिंसाचार, आरोग्य आणि संवाद कौशल्ये असे सहा स्वतंत्र विभाग या मार्गदर्शिकेत आहेत. प्रत्येक विभागात अनेक सत्रं आहेत. सहभागींची संबंधित विषय शिकण्यामागची उद्दिष्टे, सत्र घेण्याच्या पद्धती, सत्रासाठी आवश्यक असणारे साहित्य, संवादकांसाठी काही टिपणे, अधिक अभ्यासासाठी काही संदर्भ, नोंदी, स्वाध्याय आणि केसस्टडीज दिल्या आहेत. ‘नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी’, प्रशिक्षणाच्या पद्धती, प्रशिक्षणांच्या नियोजनासाठी काही आराखडे देखील दिलेले आहेत.
या मार्गदर्शिकेचा उपयोग कुणासाठी आहे? आणि हा उपयोग कसा करावा?
लिंगभाव, लैंगिकता, हिंसाचार, आरोग्य या विषयांमध्ये वेगवेगळ्या गटांतील पुरुषांसोबत काम करणाऱ्या सर्वांना या मार्गदर्शिकेचा उपयोग करता येईल. सहभागी पद्धतीने प्रशिक्षण घेण्याचा अनुभव असणाऱ्या संवादकांसाठी संसाधन साहित्य म्हणून या मार्गदर्शिकेची आखणी व रचना केलेली आहे. जे प्रशिक्षक/संवादक या मार्गदर्शिकेचा वापर करतील, त्यांनी अंशतः तरी अंतर्मुख होऊन स्वतःशी संवाद केलेला असावा. म्हणजे लिंगभाव, लैंगिकता, हिंसाचार, आरोग्य या संकल्पनांची पायाभूत समज, दृष्टीकोन, संवेदनशीलता त्यांच्यात असावी अशी अपेक्षा आहे.
सहज, सहयोग आणि तथापि या स्वयंसेवी संस्थांनी अनुक्रमे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमधून सन २००७ मध्ये ही प्रशिक्षण मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे.
‘समानतेच्या दिशेने पुरुषांसोबत काम’ या प्रकल्पाच्या माध्यमातून तथापिने महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्थायी विकास संस्था संगमनेर, रचनात्मक संघर्ष समिती नळदुर्ग, अस्तित्व समाज प्रबोधन संस्था सांगोला आणि वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभाग, सोलापूर या चार संस्थांसोबत काम केले. या कार्यक्रमांतर्गत १६ गावांमधून गाव आणि वस्ती पातळीवरील गटांद्वारे साधारण ५०० युवक व पुरुषांचा प्रत्यक्ष सहभाग सलग दीडवर्ष राहिला. या पुस्तिकेत यातीलच काही निवडक युवक, पुरुषांनी स्वतःमध्ये केलेल्या बदलांच्या गोष्टी आहेत. जेन्डर/लिंगभाव विषयातील त्यांची समज काय होती, नंतर त्यात काय बदल झाला, हे बदल घडतानाचे त्यांचे अनुभव, आलेल्या अडचणी; ही प्रक्रिया गोष्टींमधून पुढे आणण्याचा प्रयत्न पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे.
यात यशस्वी झालेल्या गोष्टी तर आहेतच, पण त्यांच्या गोष्टीही आहेत जे यशस्वी झाले नाहीत. काही स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांच्याही गोष्टी आहेत. कामाच्या निमित्ताने ‘लिंगभाव’ विषयाशी झालेली त्यांची ओळख, त्यांच्यामध्ये झालेला बदल, आयुष्यावर झालेला परिणाम, काम करत असताना सामना कराव्या लागलेल्या अडचणी; या त्यांच्या प्रवासाच्या गोष्टीही पुस्तिकेत आहेत. याशिवाय काम करताना इतर गावांच्या तुलनेत वेगळ्या अडचणी आणि आव्हानांचा सामना संस्थांना ज्या दोन गावांमध्ये करावा लागला, अशा दोन गावांच्या गोष्टीही वाचायला मिळतील. खऱ्या बदलाच्या गोष्टी, कामाच्या प्रक्रियेत टिपलेले निवडक आणि अस्सल ग्रामीण फोटोज, सुंदर चित्रं, काही मार्मिक बोधवाक्ये; या साऱ्यांनी ही पुस्तिका लक्ष वेधून घेते.
‘तोड मर्दा तोड ही चाकोरी’ ही पुस्तिका पुरुषांसोबत संवादाच्या शक्यता आणि आव्हानं समोर आणतेच, पण अशा प्रकारच्या कामाच्या मर्यादा कोणत्या आहेत यावरही प्रकाश टाकते. तसेच ही पुस्तिका या प्रकल्पाच्या मूल्यमापनाचे एक साधनही आहे. पुरुषीपणाच्या चौकटी मोडून माणूसपण जगण्यासाठी पुरुषांसोबतच्या संवादाची गरज किती नितांत आहे, हे इथं अधोरेखित होत राहते. लिंगभाव समानतेविषयी युवक आणि पुरुषांसोबत संवाद साधताना कार्यकर्त्यांना या पुस्तिकेतील गोष्टींतून पुढे आलेल्या मुद्यांचा उपयोग होऊ शकतो. तसेच पुरुषांसोबत संवाद साधण्यासाठी तथापि ट्रस्टने प्रकाशित केलेल्या काही संसाधनांबद्दल (पोस्टर्स, प्रशिक्षण मार्गदर्शिका, माहितीपट) थोडक्यात माहिती पुस्तिकेच्या मागील पानावर दिली आहे.
तथापि ट्रस्टने ही पुस्तिका २००९ साली प्रकाशित केली असून इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.
वरील मथळा असणारा लिंगभाव समानतेच्या मुद्याशी संबंधित असा हा दोन पोस्टर्सचा संच आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्यावर केवळ स्त्रियांसोबतच नाही तर युवकांसोबत, पुरुषांसोबत मर्द, मर्दानगी, पुरुषीपणा, पुरुषी सत्ता या वर्षानुवर्षापासून घट्ट रुजलेल्या चुकीच्या संकल्पना, त्यातून पुरुषांची होणारी घुसमट, निर्माण होणारी भेदभावाची दरी अशा बाबतचा संवाद साधणंही अत्यंत गरजेचं आहे. पुरुषीपणाच्या चौकटी मोडून ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठीच्या त्यांच्या जाणिवा जागवणं, ही प्राधान्याने समोर येणारी गरज आहे. या विचारांतून पुरुषांसोबत संवाद साधण्यासाठी या पोस्टर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
लिंगभाव समानतेच्या मुद्यावर युवक आणि पुरुषांसोबत, तसंच मुली आणि स्त्रियांसोबत संवाद साधतानाही या पोस्टरचा नक्कीच उपयोग करता येईल.
‘समानतेच्या दिशेने पुरुषांसोबत काम’ या प्रकल्पांतर्गतच तथापि ट्रस्टद्वारा सन --- मध्ये हा संच प्रकाशित करण्यात आला आहे.