बाल हक्क

तुम्हाला माहित आहे का?

मुलांना देखील हक्क असतात!

अगदी बरोबर वाचलंत तुम्ही! लहान मुलांचेही हक्क असतातच!! पण अजूनही हा विचारही समाजात तितकासा रुजलेला, मनापासून स्वीकारला गेलेला दिसत नाही. परिणामी कधी कळत, कधी नकळत अनेकदा लहान मुलांचे हक्क डावलले जात असतात. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं तर मोठ्यांच्या सवयीचं झाल्याचं दिसतं. काही वेळा त्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवलं जात नाही, या साऱ्याचे मुलांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच बाल हक्काचे संरक्षण ही आपल्या सर्वांची प्राधान्याने असणारी जबाबदारी आहे. केवळ आपल्या कुटुंबातीलच नव्हे तर समाजातील सर्व स्तरातील बालकांप्रति संवेदनशील दृष्टीकोन बाळगून वेळोवेळी न्याय्य भूमिका घेणं हे एक प्रौढ नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य नीट पार पाडण्यासाठी समजून घेऊयात बाल हक्क!!

‘तुम्हाला माहित आहे का? मुलांना देखील हक्क असतात!’ याविषयीचे तीन पोस्टर्स असून चौथे पोस्टर म्हणजे बाल हक्कांची सनद आहे. बाल हक्कांविषयी जाणीव जागृती करणारा असा हा ४ पोस्टर्सचा संच आहे.

बाल हक्कांची सनद

जगणं सुंदर आणि समृद्ध करण्यासाठी हक्क पाहिजेतच, तसंच जबाबदाऱ्याही हव्यात!! जबाबदाऱ्या मुलांनाही शहाणं व्हायला मदत करतात. ‘बाल हक्कांची सनद’ मुलांच्या हक्कांविषयी बोलतेच, त्याबरोबरच जबाबदाऱ्याही सांगते. सनद ही अनेक राष्ट्रांनी मिळून परस्परांशी केलेला एक करार असतो, ज्या करारावर आपल्या भारत देशानेही स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ, या सनदेत नमूद केलेला मुलांचा प्रत्येक हक्क आपल्या देशात जोपासला जाईल, अबाधित राहील याची खबरदारी भारत देशाने घेतली पाहिजे.

१९९० रोजी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेली बाल हक्कांची ही सनद नक्की काय आहे, हे आपणही समजून घेऊ!

हा पोस्टर्स संच कुणासाठी?

प्रत्येक कुटूंब, प्रत्येक शाळा, लहान मुलांच्या संपर्कात असणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या सर्वांनाच हा संच आणि बाल हक्कांची सनद उपयुक्त आहेत.

ग्रामीण महिला विकास संस्था, देवणी, लातूर यांच्यासाठी तथापि ट्रस्टने सदर मजकूराचे संपादन केले आहे.