आपल्या बाह्य अवयवांची बरेचदा आपण काळजी घेत असतो, ते आपल्याला दिसत असतात. पण न दिसणाऱ्या म्हणजे अंतर्गत अवयवांची काळजी किंवा तितकीशी दखल घेण्यात आपल्याकडून अनेकदा कसर राहते. पण आपल्या शरीरात असणारे अवयव कसे दिसतात, नेमके कुठे असतात याविषयी किमान ठराविक वयात कुतूहलही असतं. यासोबतच ते कोणकोणती कामं करतात हेही समजून घेतलं तर त्यांचं महत्व लक्षात येऊन आपण त्यांची योग्य काळजी देखील घ्यायला शिकू, अशा उद्देशांनी हे मानवी शरीराच्या आतील अवयवांचं कोडं या संसाधनाची निर्मिती झाली.
आपल्या शरीराचे आतील अवयव एकमेकांशी कसे जोडले आहेत, हे दाखवणारं हे एक कोडं आहे. आकृतीत दिलेल्या खाचांच्या जागी शेजारी दिलेल्या पानावरील अवयव सावकाशपणे काढून जोडायच्या. कोणते अवयव कुठे जोडायचे, यासाठीचा योग्य क्रम दिलेला आहे. तसेच ‘मदतीसाठी’ या नावाच्या मथळ्याखाली काही अवयव जोडताना उपयोगी पडणारी महत्वाची माहिती दिलेली आहे. मानवी शरीरातील आतील अवयव कोणकोणती कामं करतात, याबद्दलही या संसाधनात थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य कार्यकर्ते, शालेय वयोगटातील मुलं किंवा स्वयंसहाय्य पद्धतीने शिकणाऱ्या गटांसाठीही या संसाधनाचा उपयोग करता येतो. शरीराविषयीची माहिती देताना आजवर अनेक प्रशिक्षणांमध्ये पालक, शिक्षक, आरोग्य कार्यकर्ते, मुलं-मुली, स्त्री-पुरुष अशा वेगवेगळ्या गटांसोबत हे संसाधन वापरले असून यावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ. मीरा सदगोपाल यांनी १९८३ साली हे प्रथम तयार केले. २००१ मध्ये तथापि ट्रस्टने याच्या सुधारित आवृत्तीचे पुन:मुद्रण केले.
(व्हिडीओ)
सुपीकता आणि लैंगिकता समजून घेणं म्हणजे आपल्या हातात! हा या पुस्तिकेचा मुख्य विषय आहे. सुपीकता, नापिकता हे शब्द जैविक अर्थाने वापरले असून शरीर साक्षरतेचा महत्वाचा भाग आहेत. स्वतःचं शरीर, सुपीकता, लैंगिकता याविषयीच्या अनेक भावनांना, प्रसंगांना स्त्रिया सामोऱ्या जात असतात. जसं की, मासिक पाळी येणं, पाळी लांबणं, गर्भधारणा, अंगावरुन पांढरे जाणे, मासिक पाळीचे चक्र, या चक्राचा सुपिकतेशी, लैंगिकतेशी कसा संबंध आहे, सुपिकतेच्या खुणा, संप्रेरकं म्हणजे काय या आणि अशा अनेक जैविक पैलूंचा संवेदनशील उलगडा या कार्यपुस्तिकेतून अनुभवास येतो.
ही कार्यपुस्तिका प्रामुख्याने स्त्रियांसाठी आहे. तरीही स्त्रियांची ‘सुपीकता आणि लैंगिकता’ हा विषय आणि संवेदनशील दृष्टीकोन मुले, आणि पुरुषापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.
ठराविक आशय वाचल्यानंतर अनेक ठिकाणी प्रश्न दिले आहेत, तिथे स्त्रियांना आपापली उत्तरे लिहिता येतात. जी त्यांना स्वतःचं शरीर, सुपीकता आणि लैंगिकता समजून घेण्यास उपयुक्त ठरतात.
सुपीकता चक्राचा तक्ताही पुस्तिकेत आहे. तो कसा वापरायचा, त्याचा उपयोग काय याविषयी पुस्तिकेत योग्य माहिती दिलेली आहे.
या पुस्तिकेचा उपयोग वैयक्तिक तसेच गटांमध्ये वापरण्यासाठीही आहे.
‘आपल्या हातात’ ही स्त्रियांसाठी असणारी एक कार्यपुस्तिका आहे.
ठळक चित्रांच्या माध्यमातून संवादी पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.
स्त्रियांना स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या सशक्त नजरेतून पाहायला, स्वतःचा विचार करायला प्रेरित करते.
स्वतःच्या निरीक्षणातून स्वतःला समजून घेण्यासाठीची म्हणजेच स्व मदतीची काही मुलभूत कौशल्ये मिळवायला ही कार्यपुस्तिका मदत करते.
दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या प्रक्रियेतून ही कार्यपुस्तिका उदयास आली आहे.
ही पुस्तिका इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.
शरीर साक्षरता: मुलांसाठी हा किशोरवयीन मुला-मुलींसाठीचा लैंगिकता शिक्षण विषयक संच आहे. लैंगिकता शिक्षण हा कायम वादाचा ठरलेला विषय. पण या वादाला सकरात्मकपणे भेदून लैंगिकता शिक्षणासंबंधी आजवर अनेकांनी अविरत आणि मोलाचे काम केले आहे. अशाच अनेकांनी एकत्रितपणे अशा भरीव कामात घातलेली अजून एक महत्वपूर्ण कडी म्हणजे हा संच आहे.
यामध्ये तीन कार्यपुस्तिकांचा समावेश आहे. यामध्ये पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक अशा प्रकारे वयोगटानुसार तीन क्रमवार पुस्तकांची निर्मिती केली आहे. यासोबतच या विषयांवर मुला-मुलींशी संवाद साधणाऱ्या पालक, शिक्षक किंवा कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त अशी ‘संवादकांसाठी मार्गदर्शिका’ या नावाने एका मार्गदर्शनपर पुस्तकाचीही जोड आहे.
वयात येणाऱ्या मुला-मुलींपर्यंत लैंगिकता विषयक शास्त्रीय निकोप दृष्टीकोन कसा पोहचवावा, कोणत्या वयात आणि किती माहिती द्यावी असे अनेक प्रश्न असतात. या धर्तीवर आपला जन्म, उत्कांती, वयात येणं, लैंगिकता, लिंगभाव समता, आपलं आरोग्य आणि शरीर-मनाची घ्यावयाची काळजी, मैत्री, सुरक्षितता, आपल्या आवडी-निवडी, छंद म्हणजेच शरीर साक्षरता रुजवण्याचा सकस प्रयत्न या ‘शरीर साक्षरता: मुलांसाठी’ मधील कार्यपुस्तिकांतून करण्यात आला आहे.
वैज्ञानिक आकृत्या, मजेशीर कोडी, गोष्टी, चित्रं यांच्या योग्य वापराने सजलेल्या या पुस्तकांमधून साधी-सोपी प्रश्नोत्तरे, गाळलेल्या जागा भरा, चूक की बरोबर, छोटे-छोटे वैज्ञानिक प्रयोग, खेळ खेळणे, चित्रं काढणे, पोस्टर बनवणे, घोषणा तयार करणे या साऱ्याची सांगड सहजतेने घालण्यात आली आहे.
ही पुस्तकं वयवर्षे १० आणि त्यापुढील वयोगटासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या वाढीचा, विकासाचा आलेख लक्षात घेऊन आशय मांडणी करण्यात आली आहे. संपूर्ण संसाधन संचाची रचना संवादकाला सहभागींसोबत संवाद साधत सहज पद्धतीने प्रशिक्षण देता येईल अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. शिक्षक, पालक, प्रशिक्षक कार्यकर्ते या सर्वांना याचा निश्चितच खूप उपयोग होईल.
तथापि ट्रस्टने हे संसाधन साली प्रकाशित केले आहे.
‘शरीर साक्षरता: मुलांसाठी’ हा संच इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.
‘आपले शरीर = शरीरमान’ हे एक पोस्टर आहे. शरीरमान म्हणजे आपली उंची आणि वजनाचं गुणोत्तर. आपल्या वयानुसार उंची आणि उंचीनुसार वजन असणं हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असतं. शरीरमानावरुन आपले शरीर कुपोषित गटात आहे, की अतिरिक्त पोषण गटात (लठ्ठपणा) आहोत की शरीराचे वजन योग्य आहे, हे समजून घेता येते.
या पोस्टरचा उपयोग काय आहे?
आपल्या शरीराची पोषणस्थिती समजून घेण्यासाठी हे पोस्टर आहे. त्यानुसार व्यक्ती जर कुपोषित किंवा लठ्ठपणा गटात मोडत असतील तर त्यांना त्यांची पोषणस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करता येतील. शरीरमान कसे काढायचे, हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण देखील पोस्टरवर दिलेले आहे.
संजीवनी आरोग्य कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हे पोस्टर तयार करण्यात आले असून हिंदी भाषेतही आहे.
मासिक पाळीचक्राचं ‘चाक’ आणि ‘सरक पट्टी’ हा एक संसाधन संच आहे. हा संच मासिक पाळी चक्रात काय घडत आहे, याविषयी माहिती देतो. समाजात, तसेच स्त्रियांच्या मनातही पाळीविषयीचे गैरसमज खोलवर रुजलेले आढळतात, म्हणून पाळीतील शास्त्रीय प्रक्रिया समजून घेतली तर याविषयीच्या चुकीच्या धारणा मनातून नष्ट करायला मदत होते. यामुळे अर्थातच, शरीराविषयीचा शास्त्रीय आणि सकारात्मक दृष्टीकोन रुजण्यास सुरुवात होते आणि ‘आपले आरोग्य आपल्या हातात’ या तत्वानुसार स्त्रियांना स्वयं सहाय्य करायला शिकवतो. असे उद्देश बाळगून हे ‘मासिक पाळीचक्राचं चाक’ तयार करण्यात आले.
स्त्रियांच्या मासिक पाळीचं एक चक्र असतं, या चक्रादरम्यान अंडाशयात (बीजकोषात) आणि गर्भाशयात काय घडतं, हे समजून घेण्यासाठी एक ‘चाक’ बनवलं आहे. यात पाळीच्या चक्राची प्रक्रिया ८ टप्प्यांमध्ये विभागून दर्शवली आहे. यात मासिक पाळीच्या कालावधीपासून ते अंडोत्सर्जनानंतरची प्रक्रियाही दाखवली आहे.८ टप्प्यांमध्ये विभागलेलं हे चाक स्त्रीच्या शरीरात त्या त्या टप्प्यावर अंडाशयात काय होतं, गर्भाशयात काय होतं, अंदाजे किती दिवस तो टप्पा असतो, योनीमार्गातील स्त्रावांची नोंद ठेवण्यासाठी काही खुणा यांसह माहिती दिली आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या दोन संप्रेरकांशी या प्रक्रियेचा काय संबंध आहे, हे दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे.
पाळी चक्राच्या लांबीबाबतची समज वाढावी म्हणून मासिक पाळी चाकासोबत एक ‘सरक पट्टी’ बनवण्यात आली. अंडोत्सर्जनाप्रमाणे पाळीचक्राच्या लांबीत (२१ ते ६६ दिवसांपर्यंत) कसा बदल होतो ते यात दाखवले आहे. प्रत्येक पाळीचक्रामध्ये एक सूक्ष्म अंडं (स्त्रीबीज) तयार होते. अंडोत्सर्जन झाल्यावर साधारणपणे २ आठवड्यानंतर (१२ ते १६ दिवस) गर्भधारणा झाली नाही तर पाळी येते. अंडोत्सर्जन झाल्यानंतर पुढील मासिक पाळी साधारण किती दिवसांनी येवू शकते याचा अंदाज बांधण्यासाठी या पट्टीचा वापर होऊ शकतो. यातूनच ‘सुरक्षित काळ’ ओळखण्यास मदत होईल.
अर्थातच हा संसाधन संच आपल्या शारीरिक घडामोडी जाणून घेताना स्त्रियांना अधिक उपयुक्त आहे. यातून निर्माण होणारी समज स्त्रीला तिच्या पाळीचा एक वेगळा अनुभव देऊ शकते. आपल्या आरोग्याशी आपली मैत्री होण्याच्या प्रक्रियेतीलही हा एक महत्वाचा टप्पाच आहे. याबरोबरच स्त्रियांच्या शरीरातील मासिक पाळी ही एक महत्वपूर्ण प्रक्रिया शास्त्रीयदृष्ट्या समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हा संच उपयोगात येऊ शकतो.
हा संच योग्य प्रकारे वापरता येण्यासाठी चाक आणि पट्टीच्या मागील भागावर काही सूचना व संक्षिप्त माहिती दिलेली आहे. चाकावरील टप्प्यांच्या मांडणीद्वारे पाळीचक्राच्या दरम्यान गर्भाशयातील बदल टिपणाऱ्या योग्य आकृत्या, त्यांची नावे, चाक आणि सरक पट्टीत केलेला रंगांचा तसेच खुणांचा योग्य समावेश, चाक व पट्टी सरकवण्यासाठीचे सोपे तंत्र या सर्व गोष्टींमुळे पाळीचक्र समजण्यास आणि हाताळण्यास सोपे जाते.
हा संसाधन संच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रकाशित केला गेला आहे.
मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाई आपली मतं मोकळेपणाने मांडताना दिसते, तर दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानाचा वापर हिंसा आणि छेडछाडीसाठी होतानाही दिसतो. या निरीक्षणांतून तरुण मुला-मुलींच्या विचारांचा मागोवा घेण्याची, त्यांच्याशी हिंसा, लैंगिकता, समता, नातेसंबंध याबद्दल संवाद साधण्याची गरज अधिकच जाणवू लागली. विशेषतः मुलींवर होणारी हिंसा, छेडछाड रोखली जावी या उद्देशांनी २०१४ पासून तथापिच्या ‘आय सोच’ प्रकल्पाची प्रक्रिया सुरु राहिली. letstalksexuality.com किंवा सेक्स आणि बरंच काहीया वेबसाईटचीनिर्मिती हा या प्रक्रियेचाच एक महत्वपूर्ण भाग!
लैंगिकतेविषयी मराठी भाषेतून शास्त्रीय माहिती देणारी आणि योग्य, सकारात्मक दृष्टीकोन रुजवणारी वेबसाईट म्हणजेच एक ऑनलाईन संसाधन तयार करुन ११ जुलै २०१५ रोजी प्रकाशित करुन खुले करण्यात आले. लैंगिकता म्हणजे? सेक्स बोले तो, आपली शरीरे, लैंगिकतेसंबंधित कायदे, प्रेम फ्रेम, लिंगभावाची व्यवस्था, अपंगत्व आणि लैंगिकता, हिंसा आणि छळ असे अनेक सेक्शन्स वेबसाईटवर आहेत. ‘हटके’ विचार मांडणाऱ्या मराठी-हिंदी सिनेमांचे आढावे, कविता, लेख, कार्टून स्ट्रिप्स, पॉडकास्टस, व्हिडिओज अशी वैविध्यपूर्णताही वेबसाईटवर अनुभवता येते. प्रश्नोत्तरांचा एक कॉलमही आहे, जिथे वेबसाईट वापरणारे त्यांच्या मनातील प्रश्न विचारु शकतात आणि त्यामुळे त्यांचे नाव वेबसाईटवर दिसतही नाही, याबाबत संपूर्ण गोपनीयतेची खात्री बाळगली आहे. अल्पावधीत त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही मिळते. याशिवाय कमेंट लिहिण्यासाठीचा पर्यायही वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि एक ओपिनियन पोलही आहे, ज्यामुळे हा ऑनलाईन रिसोर्स संवादी बनलेला आहे. वेबसाईटचा आजवरचा प्रवास समृद्ध तर ठरला आहेच, शिवाय अल्पावधीतच भरभरून मिळालेला प्रतिसाद उत्तरोत्तर वाढत चालला आहे.
या साइटवरील विषय आणि आशय १६ वर्षांपुढील व्यक्तींसाठी योग्य आहे. ही वेबसाइट ‘तथापि ट्रस्ट – स्त्रिया आणि आरोग्य संसाधन केंद्राने’ तयार केली आहे.
वेबसाईटला नक्की व्हिजीट करा!