स्त्रियांवरील हिंसा

हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न!

हे संसाधन कशासाठी? 

‘हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न!’ ही पुस्तिका आणि फ्लिपचार्ट असा हा संसाधन संच आहे. स्त्रियांवरील हिंसाचार हा केवळ स्त्रियांच्या आरोग्याचाच नाही तर सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे, हा विचार अनेक संस्थांच्या कामांतून, अभ्यासातून पुढे येत राहिला. स्त्रियांवरील हिंसेच्या गंभीर प्रश्नाबद्दलचा हा सार्वजनिक आरोग्याविषयक पैलू महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स तसेच इतर आरोग्य व्यावसायिकांसमोर आणण्यासाठी ‘जन आरोग्य अभियान’ या आरोग्य चळवळीने आंदोलन हाती घेतले होते. त्यासाठी शिक्षण आणि संवादाचे साधन म्हणून ‘हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न!’ ही पुस्तिका आणि फ्लिपचार्ट हा संच तयार करण्यात आला. स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेमुळे येणारी आजारपणं आणि मृत्यू या दोन्हीचा आरोग्य सेवांवरदेखील ताण पडत असतो. हिंसेमुळे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडेही लक्ष वेधले जावे, हिंसेला आळा घालण्यासाठी एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या पुस्तिकेचा विचार व्हावा, असा उद्देश आहे.

आणि काय आहे या संसाधन संचामध्ये?

हिंसाचारासारख्या जीवघेण्या प्रश्नाला भिडण्यासाठी आरोग्य, कायदा सुव्यवस्था, सामाजिक क्षेत्र या सर्वानीच एकात्मिक दृष्टीकोनातून काम करण्याची गरज पुस्तिकेतून अधोरेखित होत राहते. मुख्यत्वेकरुन आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रबोधनपर साहित्य म्हणून फ्लिप चार्ट तयार केले आहेत. एकूण १२ चार्टस असून कमी वेळात जास्तीत जास्त मुद्यांवर चर्चा व्हावी अशी या चार्टची रचना आहे. प्रत्येक चार्टच्या मागे त्या चार्टमधील मुख्य मुद्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण दिलेले आहे. 

महाराष्टातील प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांमधील आजारपण आणि मृत्यू, हिंसाचार आणि आजारपण, हिंसेमुळे वेगवेगळे आजार उद्भवलेल्या स्त्रियांच्या कथा, डॉक्टरांचा सकारात्मक हस्तक्षेप, स्त्रियांवरील हिंसाचाराविषयी व्यापक भान येण्याची गरज, हिंसेचे आरोग्यावरील परिणाम, कारणे, स्त्रियांवरील हिंसाचार होण्याची शक्यता कधी जास्त असते?, हिंसा रोखण्यासाठी विविध पातळ्यांवरील उपाय, आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका, एकात्मिक दृष्टीकोनातून काम करण्याची गरज अशा मुद्यांचा ठळक समावेश फ्लिप चार्टमध्ये केला आहे.

संसाधन संचाचा उपयोग कुणासाठी आणि कसा करता येईल?

सरकारी व खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिक, आरोग्य कार्यकर्ते, सार्वजनिक आरोग्य, स्त्रिया आणि आरोग्य, आरोग्य शिक्षण, स्त्रियांवरील हिंसा, लिंगभाव समानता, मानव अधिकार अशा प्रकारच्या विषयांना, मुद्यांना घेऊन काम करणाऱ्या संस्थांना, कार्यकर्त्यांना या संसाधन संचाचा निश्चितच उपयोग आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती सभासद, निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार आणि समाजातील इतर स्त्रिया यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी, तसंच हिंसेला बळी ठरलेल्या, सामोरं जाणाऱ्या स्त्रियांच्या उपचाराचा एक भाग म्हणून त्यांच्याशी संवाद साधताना या संसाधनाचा खूप उपयोग होऊ शकतो. पुस्तिकेत आवश्यक तिथे फ्लिपचार्टचा संदर्भ दिला आहे. सत्रं घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना एकूण विषय समजून घेण्यासाठी पुस्तिकेचा निश्चित उपयोग होईल. सत्र घेणाऱ्यांनी चार्ट वापरण्याविषयी, त्यातील मुद्यांविषयी आधी पुरेशी पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे.

जन आरोग्य अभियानाच्या सदस्य असलेल्या काही संस्था-संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांतून जन आरोग्य अभियानासाठी तथापि ट्रस्टद्वारा सन २००१ मध्ये या संसाधन संचाची निर्मिती केली. हा संसाधन संच इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.

 

स्त्रियांवरील हिंसा: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न!

कोणती महत्वपूर्ण भर आहे या पुस्तिकेच्या सुधारित आवृत्तीमध्ये? 

मुख्यतः पुणे जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींसोबत स्त्रियांवरील हिंसेची नोंद आणि आवश्यक मार्गदर्शन अशा स्वरुपाच्या तथापि ट्रस्टने केलेल्या कामातून आलेले अनुभव, या दरम्यान वापरण्यात आलेल्या माध्यमांची माहिती, हिंसेच्या वाढत्या प्रमाणाची आकडेवारी, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा तसंच प्रसवपूर्व व गर्भधारणापूर्व लिंगनिवडीस प्रतिबंध कायदा आणि लिंगनिवडीच्या प्रश्नाचाही थोडक्यात मागोवा इत्यादी महत्वपूर्ण भर या पुस्तिकेमध्ये घालण्यात आली आहे.

स्त्रियांची सुरक्षित आणि सहज पोहच असणारं एक ठिकाण म्हणजे दवाखाना. स्त्री रुग्णाच्या आजाराचं वेळीच निदान, योग्य उपचार आणि मार्गदर्शन करणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे. हिंसा ही वैयक्तिक बाब नसून आरोग्याचा प्रश्न आहे. हिंसेला विरोध करण्यासाठी आरोग्य सेवांकडून स्त्रियांना वेगवेगळे पर्याय, योग्य मार्गदर्शन मिळाले तर हिंसेच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसण्यात मदत होईल. या भूमिकेतून सदर पुस्तिकेचे लेखन करण्यात आले आहे.

ही पुस्तिका कुणासाठी उपयुक्त आहे? 

महिला मंडळं, स्त्रियांसोबत काम करणाऱ्या संस्था-संघटना, आरोग्याच्या मुद्यावर काम करणारे गट, कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या पुस्तिकेचा निश्चितच उपयोग होऊ शकेल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये, तसंच लिंगभाव व हिंसेसंबंधित प्रशिक्षणासाठी पुस्तिकेतील माहिती नक्कीच उपयोगी ठरेल. 

पुस्तिकेच्या मागील पानावर स्त्रियांवरील हिंसेसंबंधित काही उपयुक्त संसाधनांचा, प्रशिक्षण साहित्याचा अंतर्भाव देखील केला आहे.

२००१ मध्ये ‘हिंसाचार: सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेची दुसरी आणि सुधारित आवृत्ती सन २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आली.

 

स्त्रियांवरील हिंसा: बदलते स्वरुप, बदलती आव्हाने

(महाराष्ट्रातील स्त्रियांवरील हिंसाविरोधी कामाचा आढावा)

ही पुस्तिका कशासाठी? 

स्त्रिया आणि आरोग्य या क्षेत्रात संसाधन केंद्र म्हणून काम करत असताना सुरुवातीच्या ७-८ वर्षांच्या काळात अनेकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे अनुभव, अभियानं आणि पाहण्यांमधून समोर आलेले प्रश्न यावरुन अशी जाणीव होत होती, की स्त्रियांवरील हिंसेशी संबंधित कायदे, अंमलबजावणी आणि लोकांचे अनुभव यात काहीतरी तफावत आहे. या पार्श्वभूमीवर स्त्रियांवरील हिंसेचा मुद्दा सखोलपणे समजून घेण्याच्या उद्देशाने हिंसाविषयक काही गोष्टींचा आढावा घेण्यात आला. हिंसेविरोधात सुरु असलेल्या कामांची स्वरुपं, महाराष्ट्राच्या विविध भागांत आढळून येणारे हिंसेचे प्रकार, हिंसेसंबंधित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा दृष्टीकोन/भूमिका, मतं, हिंसेविरोधातील काम बळकट करण्यासाठीच्या सूचना, विचार आणि गरजा; इत्यादी बाबींचा धांडोळा या आढाव्यात घेण्यात आला होता. या आढाव्यात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण २००५’ या कायद्याच्या अंमलबजावणी संबंधित काम आणि अनुभव फारसे नाहीत, इतर अनेक गटांनी या कामाचा आढावा स्वतंत्रपणे घेतलेला आहे.

महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांतून ६४ संस्था-संघटना या आढावा घेण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या संपूर्ण उपक्रमाचा आढावाच मुद्देसूद पद्धतीने या पुस्तिकेतून मांडलेला आहे. 

काय आहे या पुस्तिकेत? 

हिंसेसंबंधित कामाची स्वरुपं, स्त्रियांवरील हिंसेची स्वरुपं, स्त्रियांवरील हिंसेबद्दल कार्यकर्त्यांचे दृष्टीकोन, हिंसेच्या केसेस हाताळण्याच्या पद्धती, स्त्रियांवरील हिंसेसंबंधी काम करताना येणाऱ्या अडचणी, येणारी आव्हानं, स्त्रियांवरील हिंसेच्या स्थितीची विभागवार मांडणी अशा प्रकारे आढाव्याची क्रमवार मांडणी पुस्तिकेत केलेली आहे. 

ही पुस्तिका कुणासाठी उपयुक्त आहे? 

स्त्रियांवरील हिंसेच्या मुद्यावर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संस्था-संघटनांना, कार्यकर्त्यांना संबंधित कामाच्या योग्य दिशा ठरवण्यात हा आढावा, मांडणी निश्चितच उपयुक्त ठरली आहे. स्त्रियांवरील हिंसेच्या मुद्यावर नव्याने काम करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना हा दस्तऐवजही नक्कीच उपयोगी असेल.

 

तुमच्या बाबत असं घडतंय? याबद्दल नर्सशी किंवा डॉक्टरशी जरुर बोला.

काय आहे हे संसाधन? कशासाठी?

‘तुमच्या बाबत असं घडतंय? याबद्दल नर्सशी किंवा डॉक्टरशी जरुर बोला.’ असा मथळा असणाऱ्या दोन पोस्टर्सचा हा एक संसाधन संच आहे. हे पोस्टर्स हिंसेंचा सामना करणाऱ्या स्त्रियांना योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळण्याच्या संदर्भातील करण्यासंबंधित आहेत. 

रोज हजारो स्त्रिया स्वतःच्याच घरात शारीरिक, मानसिक, लैंगिक व भावनिक हिंसेच्या बळी ठरत असतात, पण इतरत्र कुठेही या हिंसाचाराविषयी बोलत नाहीत. त्या किमान उपचार घेण्यासाठी नजीकच्या दवाखान्यात जात असतात (किंवा तशी शक्यता असते). म्हणजेच त्यातल्या त्यात स्त्रियांची सुरक्षित आणि सहज पोहच असणारं एक ठिकाण म्हणजे ‘दवाखाना’ असतो. म्हणजेच डॉक्टर किंवा नर्सने संवेदनशीलपणे विचारपूस केली असता स्त्रिया होणाऱ्या हिंसेविषयी त्यांच्याकडे विश्वासाने बोलू शकतील, असा विश्वास वाटतो. हिंसेंचा सामना करणाऱ्या स्त्रियांना हा धीर देण्याचा एक प्रयत्न पोस्टर्सद्वारे केला आहे. व्यक्त होण्यासाठीचे योग्य ठिकाण, योग्य व्यक्तींची नव्याने ओळख करुन देणारे आणि त्यातूनच मदतीची एक दिशा दाखवू पाहणारे बोलके, नेमके आणि सूचक असे दोन पोस्टर्स आहेत.

कुणासाठी आहे हा पोस्टर्स संच? कसा वापरायचा? 

स्त्रियांवरील हिंसेच्या प्रश्नाबद्दलचा सार्वजनिक आरोग्याविषयक पैलू सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स, इतर आरोग्य सेवकांसमोर आणण्यासाठी तथापि ट्रस्टने एक प्रक्रिया राबवली होती. हिंसेचं निदान आणि नोंद करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणांचा पाठपुरावा म्हणून हा पोस्टर्स संच तयार करण्यात आला आहे. आजवर महिलांमध्ये जागृती करण्याच्या हेतूने दवाखान्यांमध्ये लावण्यासाठी या पोस्टर्सचा वापर करण्यात आला आहे.

स्त्रियांवरील हिंसाचाराकडे वैयक्तिक प्रश्न म्हणून किंवा केवळ कायद्याच्या चौकटीतून न पाहता आरोग्याचा गंभीर प्रश्न म्हणून आरोग्य यंत्रणेने दखल घेतली पाहिजे. स्त्री रुग्णावरील हिंसेचं वेळीच निदान, योग्य उपचार आणि मार्गदर्शन करणे ही आरोग्य यंत्रणेचीही जबाबदारी आहे. हिंसेला विरोध करण्यासाठी आरोग्य सेवांकडून स्त्रियांना वेगवेगळे पर्याय, योग्य मार्गदर्शन मिळाले तर हिंसेच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसण्यात मदत होईल, अशी भूमिका यामागे आहे. 

सन २००५ मध्ये हा पोस्टर्स संच तयार केला गेला आहे. 

 

गर्भलिंगनिदान गुन्हा आहे! गुन्ह्यात सहभागी होऊ नका!

काय आहे हे संसाधन? 

पीसीपीएनडीटी (गर्भलिंगनिदान आणि निवड प्रतिबंध) कायद्यानुसार गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे तपासणे गुन्हा आहे. याबाबत स्पष्टता देणारा, कायदेविषयक जनजागृती/प्रबोधन करणारा हा एकूण ५ पोस्टर्सचा संच आहे. लिंगनिदान करण्यास सरसावणाऱ्या वृत्ती आणि कृती, तंत्रज्ञानाचा गैरवापर याविरोधी भूमिका घेऊन कायद्याच्या अस्तित्वाचे, अंमलबजावणीचे महत्व हा संसाधन संच अधोरेखित करतो.

कशासाठी आणि कुणासाठी आहे हा पोस्टर्स संच? 

समाजात मुलींचे घटत असणारे प्रमाण किंवा लिंगनिदान करुन केले जाणारे गर्भपात यामुळे मुलींचा जन्माला येण्याचा हक्कच नाकारला जातो. मुलींच्या जन्माला येण्याच्या हक्कासाठी पीसीपीएनडीटी कायद्याचे खूप महत्व आहे. ‘गर्भलिंगनिदान हा कायद्याने गुन्हा आहे आणि गुन्ह्यात सहभागी होऊ नका,’ असे आवाहन पोस्टर्सद्वारे केले आहे. गर्भलिंगनिदान करण्यास डॉक्टरांनी नकार दिला तर निश्चितच चांगला बदल होईल, असे सकारात्मक पद्धतीने डॉक्टरांना आवाहन करणारे पोस्टर या संचात आहे. तसंच कुणी हा कायदा मोडत असेल तर त्यासाठी शिक्षाही आहे, याची स्पष्टता आणि संबंधित गुन्ह्याची तक्रार करण्यासाठीचा क्रमांकही पोस्टर्समध्ये दिला आहे. 

पोस्टर्स संचाचा वापर कसा करता येईल?

हे पोस्टर्स प्रबोधनासाठी सावर्जनिक ठिकाणी, कार्यलयांमध्ये, खाजगी आणि सरकारी दवाखान्यांमधील भिंतींवर लावता येतील. तसंच खाजगी तसेच सरकारी वैद्यकीय यंत्रणेतील डॉक्टरांच्या, इतर आरोग्य सेवकांच्या प्रशिक्षणांतून या संचाचा अवश्य वापर करता येईल.

सन २०११ मध्ये हा संसाधन संच तथापिने प्रकाशित केला आहे. 

 

हिंसामुक्त घर प्रत्येक स्त्रीचा अधिकार!

काय आहे हे संसाधन? कशासाठी?

हिंसामुक्त घर हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे, या भूमिकेतून दोन पोस्टर्सचा हा संच तयार तयार करण्यात आला. ‘कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण, कायदा २००५’ चे समर्थनही या पोस्टर्सद्वारे केले आहे. समाजात बहुतेकदा हे चित्र आढळतं, की पुरुषांचे अपघात रस्त्यावर होतात आणि स्त्रियांचे स्वतःच्या घरात! स्त्रियांचे स्वतःच्याच घरात झालेले (?) अपघात हे कधी जळून भाजल्याने होतात, कधी विषबाधेने, तर कधी घराजवळच्या विहिरीत पडून होतात. पण प्रत्यक्षात बहुसंख्य स्त्रिया या कौटुंबिक हिंसेच्या बळी ठरलेल्या असतात. अनेक संशोधनांतूनही हे भीषण वास्तव समोर आले आहे. स्त्रियांवरील हिंसेचे हे वास्तव सर्वांसमोर आणण्यासाठी, हिंसेला विरोध दर्शवण्यासाठी आणि हिंसेला आळा घालण्याच्या हेतूने कायद्याच्या प्रसारासाठी हा जनजागृतीपर पोस्टर्स संच आहे.

पोस्टर्स संचाचा वापर कसा करता येईल?

जनजागृतीच्या हेतूने सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके म्हणून, स्त्रियांवरील हिंसाविरोधी कार्यक्रमांमध्ये, प्रशिक्षणांमध्ये संवादाचे माध्यम म्हणून या संचाचा उपयोग करता येईल.

 

आधार: ‘हिंसेविषयक मदत व मार्गदर्शन सूची’

Adhar cover

हे संसाधन कशासाठी? कुणासाठी?

स्त्रियांवरील हिंसाचार हा स्त्रियांचा म्हणून गणला जाणारा खाजगी प्रश्न नसून ‘सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न’ आहे. याबाबत संशोधन करत, निरीक्षणे नोंदवत हिंसेच्या प्रश्नाची व्यापक स्तरावर योग्य दखल घेतली जाणं गरजेचं आहे; हे मुद्दे तथापिच्या कामातून वेळोवेळी मांडले गेले आहेत. स्त्रियांवरील हिंसेशी संबंधित मुद्यांवर विविधांगी दृष्टीकोन बाळगून वेगवेगळी कामं करत असताना तथापि ट्रस्टने सुरुवातीच्या काळात ‘आधार - हिंसेविषयक मदत व मार्गदर्शन सूची’ प्रकाशित केली. हिंसेला बळी पडणाऱ्या स्त्रिया किमान उपचारासाठी दवाखान्याची दिशा धरतात, त्यामुळे वैद्यकीय सेवेसोबतच या स्त्रियांना इतर आवश्यक माहिती मिळाली तर स्त्रियांना मदत घेता होईल, या उद्देशाने हा रिसोर्स तयार करण्यात आला. परिणामी, हिंसेला प्रतिबंध होण्याच्या प्रक्रियेतील ते एक महत्वाचं पाऊल असणार होतं. 

काय आहे या ‘आधार: हिंसेविषयक मदत व मार्गदर्शन सूची’मध्ये?

हिंसेच्या संदर्भात काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील संस्था, संघटना, समुपदेशन केंद्रे, आधारगृहे, मुलांसाठी असणारी वसतिगृहे, पोलीस यंत्रणा, व्यसनमुक्ती केंद्रे, सरकारी रुग्णालये यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक, हेल्पलाइन्स अशी मुलभूत माहिती या आधार सूचीमध्ये दिलेली आहे. दवाखान्याकडून ही आधार सूची स्त्रियांना उपलब्ध केली जाईल, असा विचार आणि तजवीज या आधार सूचीच्या निर्मिती प्रक्रियेत करण्यात आली होती.

सध्याच्या काळात या संसाधनाचा उपयोग काय?

हिंसेला सामोरं जावं लागणाऱ्या स्त्रियांसाठी एक उपयोगी साधन म्हणून सन २००६ मध्ये ही आधार सूची तयार करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात अनेक केंद्रांचे, संस्था- संघटनांचे संपर्क क्रमांक बदलले असल्याने आणि इंटरनेट सहजपणे उपलब्ध झाल्याने आजच्या घडीला या आधार सूचीचा तंतोतंत उपयोग होणार नाही. पण संस्थांच्या,केंद्रांच्या नावांसाठी आणि तथापिच्या संसाधन निर्मितीचा एक संदर्भ म्हणून याठिकाणी अंतर्भाव केला आहे. 

 

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे कायदे पुस्तिका, २०१६

पुस्तिका कशी तयार झाली आणि कशासाठी?

तथापिने मागच्या काही वर्षांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांसोबत ‘I सोच’ हा उपक्रम राबवला. लैंगिकता, समानता, सुरक्षितता, निकोप नातेसंबंध याविषयी सकारात्मक संवाद साधणारी एक स्पेस यातून तयार करण्यात आली. स्त्रिया आणि मुलींवरील हिंसेला प्रतिबंध करण्याच्या कामात तथापि सातत्याने कार्यरत राहिली आहे. यासाठी कॉलेजचा कँमप्स आणि संपूर्ण शहर सुरक्षित व्हावे, सुरक्षिततेचे महत्व जाणावे या उद्देशाने तरुणांची प्रिय असणारी इंटरनेट माध्यमे वापरुन आणि तरुण मुला-मुलींसोबत प्रत्यक्ष संवाद साधत विविध अभियाने राबवली गेली. दरम्यान या तरुण वयोगटाचा सक्षमतेकडे जाणारा प्रवास सुकर व्हावा, म्हणून त्यांच्यासाठी काही आवश्यक संसाधनांची निर्मिती करण्यात आली. त्यापैकीच ही ‘महत्वाचे कायदे पुस्तिका.’ विद्यार्थ्यांना काही विशेष कायद्यांची माहिती असणे, जाण असणे ही गरज लक्षात घेऊन सन २०१६ मध्ये खाजगी वितरणासाठी ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेचे प्रकाशन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले असले तरीही एक नागरिक म्हणून सर्वांसाठीच ही पुस्तिका उपयोगी आहे.

कोणते महत्वाचे कायदे आहेत या पुस्तिकेत? 

छेडछाडविरोधी भारतीय दंड विधानातील तरतुदी, शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगविरोधी कायदा, हुंडाबंदी कायदा, स्त्रियांवरील हिंसेसंबंधी कायदे आणि भारतीय दंड विधानातील कलमे, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा, कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा, २००५; नवविवाहितांचा छळविरोधी कायदा – ४९८ अ याबरोबरच भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचाही समावेश या पुस्तिकेत आवर्जून करण्यात आला आहे.

 

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या ‘महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध समिती’ स्थापनेसाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि माहिती पट 

या संसाधन संचाचा उद्देश काय? कशासाठी?

लैंगिक छळाची, हिंसेची कोणतीही घटना ही स्त्रियांच्या समानतेने, सुरक्षितपणे जगण्यावर घाव घालत असते. काम करणं ही तर प्रत्येकाची मुलभूत गरज असते आणि प्रत्येकासाठी कामाचं ठिकाण सकारात्मक, सुरक्षित असणं, हिंसाविरहित असणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे! पण वास्तवात अनेक स्त्रियांना अनेक ठिकाणी लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. कामाच्या ठिकाणीही शेरेबाजी, नकोसा स्पर्श, शिट्टी मारणं, सोशल मीडियाचा वापर करुन त्रास देणं अशी हिंसेचा वेगवेगळी रूपं दिसतात. आज अनेक स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शिक्षण घेत अर्थार्जनासाठी स्वतःला सज्ज करत असतात. मात्र कामाच्या ठिकाणीही अनेक स्त्रियांना लैंगिक छळाच्या झळा अगदी दीर्घ काळापासूनही सोसाव्या लागत असतात. लैंगिक छळाची वाच्यता केल्यास नोकरी जाण्याच्या किंवा बदनामी होण्याच्या भीतीने अशा अत्याचारांबाबत वाच्यता किंवा तक्रार न करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. तक्रार केलीच तरी योग्य कारवाई होण्याची खात्री नसते. यामुळे हिंसेला आळा बसण्यात अडथळे येतात, याउलट हिंसा वाढण्याचाच धोका अधिक असतो. या सर्व गोष्टींचा स्त्रियांच्या मानसिक, आर्थिक स्थितीवर आणि एकंदरीत आयुष्यावर खोलवर, दूरगामी परिणाम होत असतात. 

या पार्श्वभूमीवर १९९९ साली ‘विशाखा गाईडलाईन’ करण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक खाजगी किंवा सरकारी कार्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची स्थापना अनिवार्य करण्यात आली. तब्बल १४ वर्षे उलटूनही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या नाहीत. दरम्यानच्या काळात अनेक लैंगिक छळाच्या केसेस समोर येतच होत्या. ‘कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध प्रतिबंध, संरक्षण आणि तक्रार निवारण कायदा, २०१३’ अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरुद्ध समिती स्थापन करणं अनिवार्य करण्यात आलं. तरीही आजवर अनेक ठिकाणी अशा समित्या झालेल्या दिसत नाही. काही तुरळक ठिकाणी ‘अंतर्गत तक्रार निवारण समित्या’ स्थापन करण्यात आल्या, मात्र या समित्यांमध्ये अनेक त्रुटी दिसून येतात. कर्मचारी, सहकारी, प्रशासक, आस्थापक आणि शासन या सर्वांनीच कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखायचा तर समित्यांच्या कामकाजातील त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. लैंगिक छळ म्हणजे काय, याविषयीच्या कायद्यातील तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत. ही निकड लक्षात घेऊनच मार्गदर्शनपर संच तयार करण्यात आला आहे.

कुणासाठी उपयुक्त आहे ही पुस्तिका आणि माहिती पट? 

पुस्तिका आणि दृश्य माहिती पटाद्वारे समितीची स्थापना, कामकाज, तक्रारी आणि चौकशीबाबत, तक्रारदार महिलेच्या अधिकारांबाबत, अशा महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. सर्व प्रकारची आस्थापने, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, मॉल्स, मनोरंजनाची ठिकाणं किंवा अशी ठिकाणं जिथे १० पेक्षा जास्त स्त्री किंवा पुरुष काम करतात; अशा ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या (कॅश: कमिटी अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट) स्थापनेसाठी हा संसाधन संच नक्कीच उपयोगात येईल. या समितीतील कार्यकर्ते व संस्थांनाही याचा उपयोग होऊ शकेल. महिलांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला बळी पडावं लागू नये, भयमुक्त, सुरक्षित वातावरणात काम करता यावं, याबाबतच्या प्रयत्नांमध्ये या संसाधनाची ही एक महत्वपूर्ण भर आहे.

सन २०१६ मध्ये तथापि ट्रस्टने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे.

 

ViolenceNoMore.in

ही वेबसाईट कशासाठी? 

स्त्रियांवर केली जाणारी हिंसा हा केवळ स्त्रियांच्या नाही तर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. एक संवेदनशील मुद्दा आहे. ही हिंसा पूर्वीही विविध रुपांतून आढळत होती आणि आता तर झपाट्यानं रूपं बदलत आहे. अलीकडच्या काळात झालेल्या तंत्रज्ञानातील आमुलाग्र विकासामुळे एका क्लिकवर जग एकमेकांशी जोडलं जाऊ लागलं. यासोबतच तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरातून समाजातील मुली आणि महिलांवरील हिंसेचे प्रमाण या डिजिटल जगात अधिकाधिक वाढत आहे. परिणामी, वेगवेगळ्या स्वरुपांतून समोर येणाऱ्या हिंसेला स्त्रियांना सामना करावा लागत आहे. या प्रश्नाच्या अभ्यासातून, उहापोहातून एका ऑनलाईन संसाधनाची गरज आणि महत्व अधोरेखित होत राहिले. 

हिंसेच्या मुद्द्यासंदर्भात समोर येणारी बदलत्या काळातील आव्हानं, त्याच बदलत्या काळाची भक्कम सोबत घेऊन समर्थपणे हाताळता येतील या विचारांच्या दिशेने टाकलेल्या पावलांतून प्रत्यक्षात आलेलं संसाधन म्हणजे www.ViolenceNoMore.in ही वेबसाईट! हिंसेचा योग्य प्रकारे प्रतिबंध आणि प्रतिकार करण्यासाठी योग्य आणि आवश्यक, उपयोगात येणारी माहिती स्थानिक (मराठी) भाषेतून स्त्रियांपर्यंत पोहचली पाहिजे, त्यासाठी असा एखादा ऑनलाईन रिसोर्स याच डिजिटल जगात स्त्रियांच्याही हाताशी असला पाहिजे; या उद्देशांनी तथापिच्या प्रयत्नांतून www.ViolenceNoMore.in वेबसाईटची निर्मिती झाली. 

या वेबसाईटवर कोणती माहिती आहे आणि कुणासाठी उपयुक्त आहे? 

संबंधित कायदे आणि अधिकार, सुरक्षा नियोजन, पोलीस यंत्रणा, हेल्पलाइन्स असे आणखी काही महत्वाचे विभाग आणि महत्वाचा आशय, व्हिडिओज अशा अनेक बाबींचा समावेश वेबसाईटवर आहे. हिंसा सहन करणाऱ्या, हिंसेला सामोरं जाणाऱ्या स्त्रिया, तरुण मुली, हिंसेच्या प्रश्नावर हस्तक्षेप करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामातील व्यक्ती, यंत्रणा, संबंधित महिला संघटना, सामाजिक, शासकीय संस्था; या सर्वांना ही वेबसाईट अतिशय मदतपूर्ण ठरणारी आहे. स्त्रियांवरील हिंसेच्या वेगवेगळ्या मुद्यांसंबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करुन देण्याचा आटोकाट प्रयत्न या वेबसाईटच्या माध्यमातून केला गेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ३ जानेवारी २०१९ रोजी ही वेबसाइट प्रकाशित करुन सर्वांसाठी खुली करण्यात आली.