तथापिची पाळणाघरं आणि मुलांची सुरक्षितता

एक १२-१३ वर्षाची मुलगी पळत पळत आली आणि सांगायला लागली. ताई बाजूच्या बाईचे सहा महिन्याचे बाळ वारले. अचानक. पाळणा घरातील शिक्षिका लगबगीने काय झाले ते पहायला गेल्या. सकाळी बाळाला पाजून त्या बाईनी बाळाला झोपी घातले आणि शेजारी सांगून एका जवळच्याच घराचे घरकाम करण्यासाठी म्हणून गेल्या. त्यांच्यासाठी हे नेहमीचेच. काम आटोपून, एखाद तासात, बाळ उठण्याच्या आगोदर परत आल्या. मुल अजून झोपलेलेच आहे असे समजून त्या घरचे भांडी इ काम करू लागल्या. नंतर थोडा उशीरच झाला म्हणून पाळण्यात पहिले तर मुल निपचित पडून होते. श्वास लागत नव्हता. त्यांना शंका आली, लोकांना गोळा केले. मूल गेले होते. दवाखाण्यात डॉक्टर म्हणाले घशाला कोरड पडल्याने मुल गेले.

- वस्त्यांमध्ये सातत्याने घडणाऱ्या या आणि अशाच अनेक घटना पाळणाघरासारख्या संस्थेचे महत्व, वस्त्यांमधील मुलांची सुरक्षितता हे मुद्दे ऐरणीवर आणतात.   

 

 

तथापिने पाळणाघरांची सुरुवात केली तेंव्हा अनेक आव्हानं समोर होती. त्यातील सर्वात महत्वाचे होते मुलांच्या सुरक्षेचे. पाळणाघरांची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातील काळाखडक या वस्तीत झाली. ही या भागातील अनेक अघोषित वास्त्यांपैकी एक. त्यामुळे महानगर पालिकेच्या अनेक मुलभूत सोयी सुविधांची येथे वानवा. संडास बांधायला परवानगी नाही, मुळात ड्रेनेज लाईनच नाही, उघड्या गटारी, पक्के घर बांधायला परवानगी नाही, पत्र्यांची घरं, घरांची मर्यादित उंची, अंतर्गत पक्के रस्ते नाहीत, विजेच्या वायर्स  असुरक्षित पद्धीतीने इकडून तिकडे गेलेल्या, घरांनाच लागून मोठे डीपी, ऐन वस्तीतून जाणारा आणि नेहमी वाहणारा रस्ता अशा एक ना अनेक अडचणी.

अशा ठिकाणी पाळणा घरासाठी योग्य जागा मिळवणंच मोठ आव्हान होतं. जेम तेम दहा बाय दहा  पेक्षाही लहान, बसक्या खोल्या, डोक्याला लागतील असे पत्रे, उन्हात पोळणाऱ्या आणि पावसात अक्षरशः वाहणाऱ्या भिंती आणि छतं. पायाखालील जमीनही पाणी सोडणारी. मोकळी हवा नाही की प्रकाश नाही. अशा स्थितीत वस्तीतील ० ते ६ वयोगटाच्या मुलांचा दिवसाचे दहा एक तास संभाळ म्हणजे एक तारेवरची कसरत असणार होती. त्यासाठी अनके पायाभूत उपाययोजना करतानाच सांभाळ करणाऱ्या शिक्षिका आणि ताई यांचेही प्रशिक्षण करणे गरजेचे होते. मुलांचे वय, अवतीभोवतीचा परिसर, हाताशी असलेली साधनं आणि सर्व शक्यतांचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या.

 

अ. सुरक्षित जागा आणि परिसर

१. विजेच्या सर्व जोडण्या, वायर्स, बटन्स, मीटर्स यांचे पूर्ण ऑडिट केले गेले. त्यात आवश्यक बदल केले गेले. पत्र्याच्या, कमी उंचीच्या खोल्या, अवैध जोडण्या आणि पावसाळ्यातील धोके लक्षात घेतले गेले.

२. दरवाजे, खिडक्याना जाळ्या बसवल्या गेल्या. समोरच वाहता रस्ता असल्याने बांबू आणि लोखंडी पाईप्सचा वापर करून कुंपण तयार केले गेले.

३. भिंती, दरवाजे, छत यांची डागडुजी, नियमित देखभाल, रंगरंगोटी केली गेली.

४. प्रत्येक पाळणा घरात प्राथमिक उपचाराचे कीट सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवेले जाते. त्याच्या वापराचे प्रशिक्षण स्टाफ ला दिले आहे. ताप मोजणे, जखम साफ करणे, बांधणे, मुलाने काही गिळले तर काय करावे, मुल बेशुद्ध झाले तर काय करावे, गंभीर लक्षणं ओळखणे, दवाखान्यात कधी न्यावे इ मुद्द्यांचा प्रशिक्षणात समावेश केला गेला.  

५. वायू गळती, आग लागणे, अपघात अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले. गॅस, स्टोव, स्वयंपाक खोली, चाकू-सुरी इ पासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजले गेले. स्वयंपाक खोली वेगळी तयार केली.

६. स्वच्छता, देखभाल आणि दैनंदिन वापरासठी लागणाऱ्या वस्तू उदा. फिनेल, झुरळ किंवा इतर कीटक नाशक औषधं, लायटर, आगपेटी, इंधन इ गोष्टी मुलांच्या संपर्कापासून दूर ठेवल्या जातील याची काळजी घेतली गेली.

७. मुलांची बसण्याची, खेळण्याची, जेवणाची आणि झोपण्याची जागा स्वच्छ आणि कीटक वा इतर धोक्यांपासून सुरक्षित असेल याची खात्री केली जाते. पाळणाघरात किंवा आसपास कुठलाही प्राणी येणार याची काळजी घेतली जाते.  

 

ब. खेळणी

मुलांसाठी खेळणी विकत घेताना किंवा वापरलेली खेळणी स्वीकारताना काही काळजी घेतली गेली. खेळणी शैक्षणिक आणि मजेशीर असावीत या बरोबरच ती चांगल्या स्थितीत असावीत, स्वच्छ करता येण्याजोगी असावीत, इजा करू शकणारी, तीक्ष्ण, धारदार नसावीत हे पहिले गेले. मुलं लहान असल्यामुळे खेळणी गिळली जाणार नाहीत अशा आकाराची घेतली. कृत्रिम रंग नसलेली, खूप वजनदार नसलेली खेळणी निवडली गेली. वापरलेल्या खेळणी साठी आवाहन करतानाही या गोष्टींचे अवधान राखले गेले.

 

क. अन्न पदार्थ आणि खाण्याच्या गोष्टी

पाळणाघरातील मुलांसाठी शिजवले जाणारे अन्न आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असेल, जंतू संसर्ग होणार नाही हे पाहण्यासाठी विशेष योजना केली गेली. स्वच्छ, सुरक्षित आणि ताजे पदार्थ खरेदी करणे, ते शिजवताना काळजी घेणे, मुलांना अन्न देताना स्वच्छ भांड्यांचा उपयोग इ उपाय केले. पण त्यासोबतच मुलांसाठी शिजवले गेलेले अन्न टेस्ट करण्याची जबाबदारी पाळणाघराच्या समन्वयक कार्यकर्तीची असते. नंतरच मुलांना ते वाढले जायचे. आरोग्याच्या दृष्टीने पाळणा घर स्वच्छ आहे की नाही याची नियमित देखरेख असते.

 

ड. प्रशिक्षीत स्टाफ

२० ते २५ मुलांसाठीच्या प्रत्येक पाळणाघरात दोन शिक्षिका आणि दोन मदतनीस यांची नेमणूक केलेली आहे. कुपोषण, बाल आरोग्य, शालापूर्व शिक्षण अशा मुख्य विषयांबरोबरच अपघात, आजारपण, प्रथमोपचार, मुलांची संवेदनशील देखभाल, मुलांचे हक्क, मुलांवरील अत्याचार, कायदे अशा अनेक विषयांवरील प्रशिक्षित स्टाफ हे तथापिच्या पाळणाघरांचा एक विशेष. अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या स्थितीत काय करावे आणि काय करू नये याची नियमावली तयार केली. जवळचा दवाखाना, डॉक्टरांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता पाळणाघरात आणि शिक्षिकांच्या वहीत लिहिलेले असतात. लघवी किंवा शौचाला जाताना मुलांसोबत मदतनीस असणे, गरजेचे असल्यास मुलांना स्वतः घरी सोडायला जाणे ह्या स्टाफच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या. पालकांच्या व्यतिरिक्त इतर कोणासोबतही मुलांना सोडले जात नाही.

 

एवढे सर्व प्रयत्न करूनही ज्या परिवेशात आणि प्राप्त परिस्थितीत ही पाळणाघरं चालविली जातात तिथे एखाद्या अपघाताची शक्यता राहतेच. अनेकदा पाळणाघरात खेळायला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आलेलं मूल पडलं किंवा काही तरी लागलं किंवा वाहता रस्ता असल्या कारणाने गाडीला धडकलं अशी स्थिती येतेच. त्यावेळेस तत्काळ प्रथमोपचार करून मुलाला दवाखान्यात घेवून जाणे असे उपाय केले जातात. परंतु आज या पाळणाघरांच्या रूपाने या अघोषित वस्त्यांमध्ये मुलांच्या दृष्टीने आणि त्यांच्या अधिकारांच्या दृष्टीने नगण्य असलेला अवकाश रुंदावला गेला आहे आणि एक सुरक्षित, मैत्रीपूर्ण जागा तयार झाली आहे हे अगदी खरेच आहे.  

 

 (पाळणा घराच्या ऐन समोर अनेक घरांना लागून एमएसइबी चा एक ट्रान्सफॉर्मर होता. मे महिन्याची दुपार आणि अचानक एक मोठा आवाज होवून ट्रान्सफॉर्मर जळू लागला. काही वेळातच आगीने आजूबाजूच्या १५-२० घरांना वेढले. वेळीच सावध होवून घरांतील बाया-माणसं, मुलं बाहेर पडली म्हणून बचावली. जीवित हानी नाही झाली पण झोपड्या त्यातील सामानासह जाळल्या. कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली. पुढची दोन महिने सर्व परत स्थिर होईपर्यंत लहान मोठी सर्व मुलं दिवसभर पाळणाघरात यायची. मुलांच्या निवाऱ्याचा आणि खाण्याचा प्रश्न दिवभारासाठी तरी पाळणाघर सोडवू शकले. संकट काळी पाळणाघर वस्तीतील कुटुंबाच्या मदतीला धावून आले म्हणून लोकांमध्ये  विश्वास निर्माण झाला. पाळणाघरांची स्वीकारार्हता वाढली.)