पाळणाघर आणि बाल संगोपन – स्त्रियांसाठी एक संधी

 

पाळणाघर यशस्वीपणे चालली यात मुख्य वाटा हा आमच्या ताईंचा होता. या सगळ्यांची निवड वस्तीतूनच केली होती. पालक आणि त्या एकमेकांना ओळखत होत्या. त्यांची बांधिलकी निर्माण होण्यात त्यांच्या स्थानिक असण्याचा फायदा झाला. पालक विश्वासाने मुलांना पाळणाघरात सोडू लागली. वस्तीची माहिती असल्यामुळे लोकांपर्यंत सहज पोच निर्माण होऊ शकली. त्यांची शिकण्याची इच्छा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आणि स्वतःची एक आदरपूर्ण ओळख निर्माण व्हावी म्हणून असलेली धडपड त्यांना हे काम पुढे घेऊन जाण्यासाठी कामी आली. अनेकींसाठी हे काम आयुष्याला वळण देणारी गोष्ट ठरली आहे. हिंसा, दुर्लक्ष, अपमान, आजारपण, गरिबी यांचा दैनंदिन जीवनात सामना करणाऱ्या या बाया आज ताठ मानेने उभ्या आहेत आणि स्वतःसोबतच इतरांना जगण्याचे बळ देत आहेत. 

 

भारताच्या एकूण कामगार विश्वात स्त्रियांची भागीदारी कमी होत आहे असे संदर्भ अनेक अभ्यासातून आज पुढे येत असताना दिसतात. स्त्रिया मोठ्या संख्येने घरातच अडकून पडण्यासोबातच बाजारात लागणारे कौशल्य अंगी नसणं, तशा संधीची अनुपलब्धता आणि पारंपारिक कौशल्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गैरलागू ठरणं, रोजगार हिरावले जाणं ही महिलांचे सार्वजनिक जीवनातील टक्का घटण्याची काही कारणं दिली जातात. ह्या मुद्द्यांना उत्तर म्हणून व्यावसायिक पाळणाघर चालवण्याचे कौशल्य महिलांना देऊन त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यात मदत कारणं हे आणखी एक उद्दिष्ट ठेवून या प्रकल्पात एक प्रयोग केला गेला. स्वतंत्र आणि आत्मनिर्भर पाळणाघर चालवण्याचे प्रशिक्षण वस्तीतीलच महिलांना दिलं गेलं. परंतु जागेचा अभाव, लोकांची फीस देण्याची क्षमता नसणे ई अनेक अडचणी स्वतंत्र आणि आत्मनिर्भर पाळणाघर सुरु करण्याच्या मार्गात आल्या. वर म्हटल्याप्रमाणे निम्न आर्थिक स्तरातील मुलांसाठी आत्मनिर्भर पाळणाघराचे एक मॉडेल तयार करणं ही या प्रकाल्पमागाची दृष्टी होती. या पाळणाघरांनी अशा प्रकारच्या स्पेस ची आवश्यकता तर नक्कीच पुढे आणली. पण निम्न आर्थिक स्तरातील समूहांसाठी जर असे अवकाश तयार करायचे असतील तर त्यांना सुरुवातीला शासकीय अथवा इतर मदतीची आवश्यकता असणार हे ही खरंच आहे.