पाळणाघर- शहरी गरीब मुलांसाठीचा हक्काचा अवकाश

 

पाळणाघरं रुजवताना, उभी करत असताना अनेक अडचणी आल्या. पालाकांचा विश्वास बसायला वेळ लागला. मूलं पोटभर खाऊन, खेळून दमली की छान झोपायला लागली तेंव्हा तुम्ही मुलांना काही तरी खाऊ घालत असाल असंही बोलणं ऐकायला मिळालं. वस्त्यांमध्ये वडार, मुस्लीम, दलित समूहांमधील जातीय उतरंड अनुभवायला मिळाली. पुरेशा आणि सुरक्षित जागेचा अभाव, पाण्याची कमतरता, बाथरूम-संडाससाठी जागा आणि ड्रेनेज व्यवस्था नसणं, राजकीय, प्रशासकीय अनास्था अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. या पाळणाघरात प्रवेशासाठी प्रती महिना जी किरकोळ फीस होती ती देणंही अनेक कुटुंबांना शक्य नव्हतं.   

 

आज चार वर्षानंतर ही पाळणाघरं वस्त्यातील कुटुंबांची एक प्रकारे गरज बनली आहेत. रविवारची सुट्टीसुद्धा बंद करा अशी मागणी बाया बाप्ये करतात. इथे मूल सुरक्षित असल्याची खात्री त्यांना असते. त्याला पोटभर जेवण आणि आराम आणि झोप मिळते आहे याची खात्री असते. मूल घरी आल्यानंतर गाणी म्हणून दाखवितं, नवीन काय शिकविलं ते सांगतं याचे कौतुक असते. मुलं कमी आजारी पडतात याची जाण पालकांना आहे. शिवाय प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न दोन-चार हजाराने वाढलं आहे कारण दोन्ही पालक कामावर जाऊ शकतात. विशेष म्हणजे ज्या बाईला घरात रहावं लागत होतं, तिला आज बिनघोर कामावर जाण्याची, चार पैसे कमावून आणण्याची संधी आहे. अनेक बाया ज्या आपल्या घराच्या कर्त्या आहेत, ज्यांना जोडीदार नाही किंवा तो कामाचा नाही (आणि हे सर्रास आहे) अशा बायांसाठी हे पाळणाघर जीवनावश्यक गरज बनले आहे.   

 

० ते ३ वयोगटासाठी कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नसणं हे एक पाळणाघर चालू करण्यामागे होतं. वस्त्या जेंव्हा निवडल्या तेंव्हा जो सर्वे करण्यात आला त्यात या वयोगटातील मुलांच्या आणि पालकांच्या गरजा काय आहेत, त्या गरजा पूर्ण करतील अशा कोणत्या सामाजिक/शासकीय सुविधा वस्त्यांमध्ये उपलब्ध आहेत यांची माहिती घेतली गेली. तेंव्हा पोषण, आरोग्य, सुरक्षिततेची हमी देणाऱ्या जागाच वस्त्यात नाहीत ही बाब समोर आली. प्रत्येक वस्तीत अंगणवाडी आहे पण या महत्वाच्या शासकीय योजनेचे स्वतःचे असे काही मुलभूत प्रश्न आहेत ज्यामुळे योजनेच्या परिणामकारकते पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हाच सार्वत्रिक अनुभव या वस्त्यांमधील अंगणवाड्यांचाही आहे. शिवाय अंगणवाडी ३ वर्षे व पुढील मुलांसाठी असल्याने ० ते ३ वयोगटासाठी त्यांचा तसा फायदा होत नाही. शहरी शासकीय आरोग्य व्यवस्थेची दुर्दशाही सर्वश्रुत आहे. या पाळणाघरांमुळे अंगणवाडी आणि शासकीय आरोग्य व्यवस्था यांच्या सोबत जवळून काम करता आले शिवाय जन संवादातून त्यांची परिणामकारकता वाढवता आली. तीन वर्षापुढील मूल अंगणवाडीत नियमित जावं आणि पोषक आहार चे महत्व लोकांना पटावे यासाठी प्रयत्न करण्यात आला.