स्त्रिया आणि कामाचा तिहेरी बोजा

 

स्त्रियांच्या आरोग्याचा आणि त्यांच्यावर असणाऱ्या कामाच्या बोजाचा जवळचा संबंध आहे. पुरुषप्रधान समाजात बाईला असणारा दुय्यम दर्जा, घरातील आणि घराबाहेरील कामाची विषम विभागणी, मुळातच कमी प्रमाणात असणाऱ्या आणि विविध कारणांनी हिरावल्या जाणाऱ्या रोजगाराच्या संधी अशा अनेक कारणांनी स्त्रिया विकासाच्या प्रक्रियेत मागे राहतात. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याचे मुद्दे ऐरणीवर आणत असतानाच महिलांना स्व-विकासाचे अवकाश प्राप्त करून देण्यासाठी काही प्रयोग कारणं, ते स्त्रिया आणि समाजापर्यंत पोचवणं हा तथापिच्या कामाचा भाग राहिला आहे.

तथापितर्फे (फोक्सवेगन वर्कर्स कौन्सिल आणि टी डी एच जर्मनी यांच्या मदतीने) ०-३ वर्षांसाठीच्या मुलांसाठी वस्ती पातळीवर पाळणाघरांचा प्रयोग राबविताना काही उद्दिष्ट डोळ्यासमोर होती. कुपोषणाशी लढा, आरोग्य, सुरक्षितता आणि शाळापूर्व शिक्षणाच्या संधी या तीन मुद्द्यांना संबोधित करणारं पाळणाघराचं मॉडेल उभं करण्याचं मुख्य लक्ष डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात आला. परंतु ह्यासोबतच आणखी एक दृष्टीकोन या प्रयोगाच्या मागे होता.

स्त्रियांवर असणारा कामाचा तिहेरी बोजा कमी करून वर म्हटल्याप्रमाणे विकासाच्या संधी मिळवण्यासठी स्त्रियांना थोडी उसंत मिळवून देणं हाही उद्देश या प्रयोगामागे होता. घरचं काम करा, बाहेरून कमावून आणा आणि मुलांना जन्म देऊन त्यांचे पालन पोषणही करा हा तो तिहेरी बोजा. या लादलेल्या सांस्कृतिक जबाबदाऱ्या निभावताना आपल्या इच्छा आकांक्षाचा त्याग सहसा बाईलाच करावा लागतो. तो ही अशा काळात जेंव्हा तिच्या आयुष्याला आकार देऊ शकणाऱ्या संधीची उपलब्धता अधिक असते. आपले काम अर्ध्यावर सोडून मूल झाले म्हणून, मग मूल आत्ता एकच वर्षाचे आहे, दोनच वर्षाचे आहे म्हणून आणि पुढे शाळा वगेरे आहे म्हणून घरी राहावं लागणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत. असा त्याग न करणारी आणि बाळाला सोडून कामाला प्राधान्य देणारी बाई चांगली बाई ठरत नाही. स्वतः स्त्रियांच्या मनात आपल्या अशा निर्णयाचा अपराधी भाव कायम असतो.

हा भाव काढून टाकण्यात या प्रयोगाने एक महत्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला बायांना नवरा आणि सासरा यांच्या अपरोक्ष, लपून छपून मुलाला पाळणाघरात पाठवावं लागायचं. पाळणाघराला विरोध करणारे पुरुष पालक आज आमच्या या वस्त्यांमध्ये संध्याकाळी सहा वाजता मुलांना घ्यायला येउन थांबतात कारण आई पालक आजून कामावरून आलेली नसते. हे बदल खूप हळू हळू पण निश्चितपणे झाले आहेत. मुलांना हक्काची आणि सुरक्षित जागा तर मिळतेच पण आया कामावरून घरी जाऊन थोडा आराम करून मुलांना घ्यायला येतात. काबाड कष्टातून वस्तीतील बायांची सुटका नसली तरी या पाळणाघरांमुळे श्वास घेण्याएवढी उसंत या बायांना मिळवून दिली आहे.