० ते ३ वर्षे वयातील मुलांमधील कुपोषण कमी व्हावे आणि त्यांची शारीरिक व मानसिक व भावनिक विकास होण्याच्या उद्देशाने राळेगाव येथे तीन (सावनेर, रावेरी, खेमखुंड) पाळणाघरं संजीवनी प्रकल्पाअंतर्गत सुरु आहेत.यावर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त ‘बाल आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले.  स्टुडंट्स ऑफ लाइफ स्कूल, डान्सिंग विथ टायगर्स या उपक्रमातल्या ऋतुजा आणि तिच्या मैत्रणींच्या मदतीतून हा मेळावा घेण्यात आला. तरुण आणि सामाजिक बांधिलकीचे भान असलेल्या पुण्यातील या मैत्रिणींच्या सहकार्याने  ४७ मुलांनी विविध खेळात सहभाग (धान्य निवड, प्राणी ओळख, धावणे, बडबडगीत गाणे इ.) घेवून साजरा केला. विशेष बाब म्हणजे हा कार्यक्रम फक्त पाळणाघरातील मुलांपर्यंत मर्यादित नव्हता तर अंगणवाडीतील मुलेही सोबत होती. खऱ्या अर्थाने मुलांनी ‘स्वतःचा दिवस’ साजरा केला. मुलांचे कौतुक करण्यासाठी पालकांबरोबरच अंगणवाडी कार्यकर्तीदेखील सक्रीयपणे सहभागी होती. मुलांना बक्षीस देवून कौतुक करण्यासाठी आय.सी.डी.एस. केंद्राच्या पर्यवेक्षिकाही खास उपस्थित होत्या.