तथापि ने ‘letstalksexuality.com-सेक्स आणि बरंच काहीही मानवी लैंगिकता या विषयावर मुख्यतः तरुणांशी संवाद साधणारी वेबसाईट सुरु केली तेंव्हा या पोर्टलला वाचकांकडून तुफानी प्रतिसाद मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती. पहिल्या वर्षी या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या २ लाखांच्या घरात गेली तर आज दोन वर्षे पूर्ण झाले तेंव्हा तीच संख्या १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. मुख्यतः १५ ते ३५ वयोगटातील मुलगे आणि पुरुष (६५% विजिटस) या वेबसाईटला भेट देताना दिसतात. आज मागे वळून पाहतो तेंव्हा त्याची काही प्रमुख आणि स्वाभाविक कारणं लक्षात येतात. उदा. लैंगिकता हा विषय. खरं तर हा एक अतिशय मुलभूत, प्रमुख मानवी गरजांपैकी एक तरीही तितकाच नाजूक, सुंदर, अद्भुत आनंदाशी संबंधित विषय. पण लैंगिकतेचा उल्लेख अनेकांच्या मनात बहुतेक वेळेस वेदना, लाज, वैषम्य, संकोच, शरम, भीती, किळस, न्यूनगंड, अपराध या भावनाच निर्माण करतो. वेबसाईटवर येणारे प्रश्न आणि अभिप्राय अशाच अनुभवांनी आणि भावनांनी ओतप्रोत भरलेले असतात. तरुण, प्रौढांच्या मनात स्वतःच्या लैंगिकतेबद्दल, तिच्या अभिव्यक्तीबद्दल अनेक शंका, प्रश्न, भीती काळाच्या ओघात तयार होतात पण त्यांचे समाधान त्या त्या वेळेस क्वचितच होते. किंवा होतच नाही अशीच स्थिती असते. आलेले अनेक अनुभव निव्वळ वेदनादायी असतात आणि ते व्यक्त करायला, प्रश्नांची उत्तरं शोधायला अजिबात जागा नसते. ह्या वेबसाईटने ती जागा उपलब्ध करून दिली. लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही विषयाचे वावडे या वेबसाईटला नाही. वैज्ञानिक माहिती, मोकळा-संवादी अवकाश आणि प्रश्नांना, शंकांना संवेदनशील प्रतिसाद या गोष्टी वेबसाईट एवढी हिट होण्यास कारणीभूत आहेत. वेबसाईटच्या वापरकर्त्याला किंवा कर्तीला आपली ओळख देण्याची गरज नसणे (complete anonymity), माहिती बद्दलची पूर्ण गुप्तता (confidentiality) ह्या बाबीही या वेबसाईटच्या पॉप्युलर होण्यासाठी कारणीभूत आहेत.
 
सेक्स आणि बरंच काही..
 
आपल्या पुरुषप्रधान, जातीप्रधान, विषम समाजाच्या विशिष्ट सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर लैंगिकतेची चर्चा दमन, वेदना, अन्याय, पितृसत्तेचे स्त्री-पुरुष किंवा तृतीय पंथीयांसाठीचे विषम अविष्कार, हिंसा या मुद्द्यांच्या भोवती केंद्रित असणं साहजिक आहे. तसंच ते अपरिहार्यही आहे. ज्या जगात आम्ही जगत आहोत तिथल्या या समस्त भेदांना आणि या भेदांच्या परिणामांना टाळून किंवा दुर्लक्ष करून लैंगिकता, तिची अभिव्यक्ती यांची चर्चा होऊच शकत नाही. तरुण मुलं-मुलींसोबतच्या संवादातून त्यांच्या लैंगिक जीवनातील अपमान, अनादर, अन्याय, भीती आणि न्यूनगंड व्यक्त करणारे जे अनुभव पुढे येतात तेसुद्धा याच विषम पर्यावरणाचे परिणाम असतात. म्हणूनच वेबसाईटवर असो की प्रत्यक्ष; संवादाचा आशय याच दृष्टीकोनातून ठरवावा लागतो. त्यांना काय माहिती पाहिजे, त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांचे कन्सर्न्स काय आहेत हे जाणून त्यांची दखल संवाद मजकूर तयार करताना घ्यावी लागते.
 
तरुणांशी हा संवाद करत असताना लैंगिकतेच्या एका अर्थाने या नकारात्मक बाजूला प्रतिसाद देण्यातच अधिक शक्ती आणि जागा जाताना दिसते. मानवी लैंगिकतेची सकरात्मक बाजू, आनंद, लैंगिक नात्यांतील सौंदर्य, प्रेम, आकर्षण आणि त्यांची अभिव्यक्ती, लैंगिक इच्छा त्यांची पूर्ती, प्रणय क्रीडा, लैंगिक सुख, अगदी आसणं (positions) सुद्धा, या मुद्द्यांबद्दल बोलणं फारसं होताना दिसत नाही.   
 
मुलगे आणि पुरुषांचे जग
मुलगे आणि पुरुषांबाबत बोलायचे झाले तर हस्तमैथुन, लिंगाचा आकार, परफोर्मंसची चिंता, शीघ्रपतन, या त्यांच्या चिरंतन शत्रूंबद्दलची (?) सनातन भीती सतत संवादातून समोर येते. पुरुषांची लैंगिकता पुढाकार, आक्रमकता, मी इतक्या वेळा करू शकतोच्या गणितात आणि लांबी, रुंदी, आकार व अंतर या भौमितीय प्रमेयात अडकलेली दिसते. अनेकांचे संपूर्ण लैंगिक जीवन आणि पर्यायाने सहजीवन याच काल्पनिक संकटांनी ग्रस्त आणि बाधित झालेले समोर येते. वीस-वीस वर्षे संसार करणारे बाप माणसं ते नुकतेच विशीत पदार्पण केलेले पोरं मला लवकर संपण्याची भीत वाटते, माझा आकार कसा वाढवू, रोज हस्तमैथुन केल्याने भविष्यात काही प्रोब्लेम होईल का? ‘एका आठवड्यात किती वेळा सेक्स करावा ते मुखमैथुन दरम्यान वीर्य गिळल्यास दिवस जातात का? किंवा अँलोपँथी औषधाने लिंगताठरता संभोगाचा कालावधी वाढवता येतो का? अशा स्वरुपाचे प्रश्न विचारताना दिसतात. आपल्याच शरीराच्या आणि शारीरक प्रक्रियांच्या अगदी मुलभूत माहितीपासून वंचित राहिल्याने आलेले हे कुपोषण पुरुषांच्या सर्व जीवनाला व्यापून राहिल्यासारखे दिसते. याच कुपोषणाचा परिणाम पुरुषांची लैंगिकतेची समज खुंटण्यावर झालेला दिसतो. 
स्वतःच्या लैंगिकतेचे अर्धवट, खोटे, वरचढ आणि दांभिक आकलन एका बाजूला तर स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल दमनकारी, अन्याय्य समज दुसऱ्या बाजूला. एखाद्या मुलीला किती वेळा झवले आहे हे कसे खावे, योनी फाडली नसेल तर वीर्य योनीत जातं का? गरोदरपणा येऊ शकतो का?’ ‘शेजारी घरातील मूलीला झवायचे आहे यासाठी काय करु?’ ‘मला तिला रोज करावं वाटतं पण तिची तेवढी क्षमता नाही. काय करू जेणेकरून तिची क्षमता वाढेल? असे हे सर्व प्रश्न आपल्या एकूणच सकारात्मक जीवन मूल्यांपासून आम्ही किती फारकत घेतली आहे हे दर्शवितात.
पुरुषांच्या लैंगिकतेचे सर्व प्रदेश असे भणंग आणि रखरखीत वळवंटाचे. पुरुषांचीच गोची करणारे. माणूसपणा पासून दूर नेणारे. मुलभूत माहितीअभावी आलेली असहाय्यता, परर्फोर्मंस करू शकत नाही या अपराधी भावातून आलेला न्यूनगंड,  मानवी निव्वळ संवेदनशिलतेअभावी आलेला स्त्रियांबद्दलचा कमालीचा अनादर, स्वतःच्या आणि इतरांच्या अस्तित्वाविषयी, अधिकारांविषयीची कमालीच्या बेफिकिरी दूर करताना परत मानवी मूल्यांना साद घालणे, लैंगिकतेच्या दृष्टीने वैज्ञानिक माहितीसोबतच संमती, आदर, सुरक्षितता, विविधता, निवडीचे स्वातंत्र्य या मूल्यांना आवाहन करणे, ते भिनवणे असा हा संवादा चा प्रवास क्रमप्राप्त असतो.  
पुरुषांसोबत संवादाचा हा प्रवास अनेकदा इतका दमवणारा असतो की त्यांच्या सोबतच्या संवादात लैंगिक अभिव्यक्तीतील आनंद, सुख, प्रयोगशीलता, सुप्त कल्पना (fantasies) आणि लैंगिक सुख मिळवण्याच्या मार्गातील वैविध्य अशा मुद्द्यांना संवादात फारशी जागा मिळत नाही. त्यांच्या लेखीही अनेकदा याला फारसा अर्थ नसतो हे जाणवत राहते. पुरुषांच्या मनाची ही लैंगिक पौगंडावस्था जाता जात नाही.
 
मुली आणि स्त्रियांचे जग
मुली जेंव्हा आपले अनुभव, प्रश्न मांडतात तेंव्हा त्यातून पुरुषप्रधान व्यवस्थेत त्यांच्यावर लादली गेलेली बंधनं समोर येतात. मुलींना आपल्या लैंगिक अभिव्यक्तीची आणि मुळात लैंगिकतेची वाटत असलेली भीती, लाज त्यांना मर्यादा घालताना दिसते. सौंदर्याच्या पुरुषी कल्पना, पाळीबद्दलची मिथकं, नको असलेली गर्भधारणा, जोडीदाराचा बेजाबदारपणा आणि त्या संबंधीची समस्त प्रकारची भीती, नाते संबंध, त्यातील समर्पणाचा (बाईनेच करावयाच्या) दबाव आणि त्यानुसार अपेक्षित सामाजिक वर्तन यांचा प्रचंड दबाव त्यांच्यावर दिसतो. पाळी चुकली आता काय करू, तो कंडोम वापरत नाही, ब्रेस्ट साईज कशी वाढेल, पिंपल्स कसे टाळावेत, सेफ पिरीयड, संसर्ग, गर्भधारणा होईल का, बदनामीची भीती या विषयांभोवती अनेकदा त्यांचे अनुभव, प्रश्न असतात. त्यांच्या प्रश्नांना लैंगिक आरोग्य, हिंसेच्या विरुद्ध सावध करणे, नको म्हणण्याचे महत्व पटवून देणे असा प्रतिसाद संवादातून दिला जातो.     
 
अशा स्थितीत, ‘prevention is better than cure’ रुपी या संवादात अधिक जान आणता येणं शक्य आहे असं वाटत राहतं. आपल्या लैंगिक अभिव्यक्तीच्याबाबत त्यांना अधिक मुखर करणारा, परंपरेने लादलेली बंधनं तोडत आपली लैंगिकता निर्भीडपणे, उघडपणे आणि निःसंकोचपणे मांडायला उद्युक्त करणारा संवाद अनुभव देता येणं महत्वाचं आहे. मुलींची लैंगिकता अशा अनेक पितृसत्ताक बंधनात अडकलेली, त्यांचे ओझे वाहणारी दिसते. हे ओझे उतरवून आपल्या लैंगिकतेचा मुक्त अविष्कार करण्यात, आपल्या इच्छा बोलून दाखवण्यात, demanding असण्यात, ‘passive’ पेक्षा ‘active’ असण्यात, हवे तेंव्हा वरती असण्यात काही वाईट नाही हे मुलींना सांगायला पाहिजे. मुलींना नको म्हणण्यातील आवश्यक ठामपणा आणि स्पष्टपणाची निकड समजावून सांगतानाच हवंय असं वाटणं आणि ते म्हणणंसुद्धा सहज आहे, परफेक्टली नॉर्मल आहे आणि सुंदरही आहे हेही सांगायला पाहिजे.
पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या किंवा इतर समूहांच्या लैंगिकतेची चर्चा आनंदाच्या (pleasure) अंगाने करताना तिलाही मानवी मुल्यांचाच आधार आहे आणि नसेल तर तसा तो जाणीवपूर्वक द्यावा लागेल. लैंगिकतेशी संबंधित कुठलाही संवाद संमती, आदर, खाजगीपणा, निवड, विविधता आणि सुरक्षितता अधोरेखित आणि प्रसारित करणारा आसणं, त्याचं भान संवादकर्त्याला असणं मात्र महत्वाचं आहे.
 
अच्युत बोरगावकर
९८५०८५१४९९
सदर लेख ‘पुरुष उवाच- तरुणाईच्या डोक्याला खुराक...’ दिवाळी अंक २०१७ मध्ये प्रकाशित झाला आहे.